५० हजार घरे अन् ५० हजार लोकांना रोजगार
By admin | Published: March 7, 2016 02:41 AM2016-03-07T02:41:59+5:302016-03-07T02:41:59+5:30
उपराजधानीचा चौफेर विकास होत आहे. मेट्रो रेल्वे, एम्स, आयआयटी,उड्डाणपूल असे प्रकल्प उभे राहात आहे.
नितीन गडकरी : महिला उद्योेजिका मेळाव्याचे उद्घाटन
नागपूर : उपराजधानीचा चौफेर विकास होत आहे. मेट्रो रेल्वे, एम्स, आयआयटी,उड्डाणपूल असे प्रकल्प उभे राहात आहे. या प्रकल्पांत २५ हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. यातून ५० हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल. तसेच ‘सर्वांसाठी घरे’ योजनेतून गरिबांसाठी ५० हजार घरे उभारण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी दिली.
महापालिकेचा समाजकल्याण विभाग व महिला बाल कल्याण समितीच्या माध्यमातून कस्तूरचंद पार्क येथे आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. महापौर प्रवीण दटके अध्यक्षस्थानी होते. विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, भाजपचे शहर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, प्रा. अनिल सोले, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, आयुक्त श्रावण हर्डीकर, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती रश्मी फडणवीस, शिक्षण सभापती गोपाल बोहरे, समाजकल्याण अधिकारी सुधा इरस्कर आदी उपस्थित होते.
शहराचा विकास करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. शहराचा चौफेर विकासही होत आहे. प्रधानमंत्री आवास योजना ‘सर्वांसाठी घरे’(शहरी) राबविली जात आहे. यासाठी महापालिकेतर्फे सर्व्हे सुरू आहे. या योजनेंतर्गत शहरातील ५० हजार गरीब लोकांना माफक दरात घरे दिली जाणार आहेत. कार्यक्रमात ज्या महिलांचा सत्कार करण्यात आला, त्यांनी विपरीत परिस्थितीत न डगमगता व्यवसाय करून आपल्या मुलांना घडविले.
संकटावर मात करण्याचा निश्चय केला तर त्यात आपण यशस्वी होतो. महापालिकेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या मूलभूत सुविधा देण्यासोबत विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.
यातूनच महिलांना रोजगार प्राप्त व्हावा या हेतूने महापालिकेच्या शाळातील विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्याचे काम महिला बचत गटाकडे सोपविण्यात आल्याची माहिती प्रवीण दटके यांनी दिली. महिला उद्योजका मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद असून एक तासात २०० स्टॉलचे बुकिंग झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उद्योजिका सरोज पोळ, रंजना गणवीर, मंगला राहाटे, भक्ती आमटे, माया शेंडे, अर्चना बन्सोड, शालिनी सक्सेना, मंगला महाजन, सुजाता वासनिक व संघमित्रा चव्हाण आदींचा सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
रश्मी फडणवीस यांनी प्रस्ताविकातून महिला उद्योजिका मेळाव्याची माहिती दिली. संचालन रेणुका देशकर यांनी तर आभार ज्योत्स्ना देशमुख यांनी मानले. (प्रतिनिधी)
अडचणीवर मात करून चारचौघींना रोजगार
महिला बचत गटातील महिलांनी अडचणीवर मात करून आपल्यासोबतच चारचौघींना रोजगार उपलब्ध केला आहे. व्यवसाय व कु टुंबाचा समन्वय साधून या महिलांना पुढे जावे लागत आहे. महिलांना सर्व आघाड्यावर लढताना मानसिक ताण येतो. परंतु संकटात न डगमगता प्रगती करा असे आवाहन सोनाली कुलक र्णी यांनी केले.