पासपोर्ट सेवाकेंद्रात स्वीकारणार ५०० अर्ज
By admin | Published: January 29, 2015 01:04 AM2015-01-29T01:04:47+5:302015-01-29T01:04:47+5:30
आॅनलाईन अर्ज प्रणाली सुरू झाल्यापासून पासपोर्ट कार्यालयात येणाऱ्या अर्जांची संख्या वाढीस लागली आहे. पासपोर्ट सेवा केंद्रात दररोज ५०० अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. पासपोर्ट कार्यालयाच्या
पासपोर्ट कार्यालयाचा निर्णय : अर्जदारांच्या संख्येत होतेय वाढ
नागपूर : आॅनलाईन अर्ज प्रणाली सुरू झाल्यापासून पासपोर्ट कार्यालयात येणाऱ्या अर्जांची संख्या वाढीस लागली आहे. पासपोर्ट सेवा केंद्रात दररोज ५०० अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. पासपोर्ट कार्यालयाच्या निर्देशांनंतर ‘आॅनलाईन’ अर्ज प्रणालीत हा बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत ४५० अर्ज स्वीकारून टोकन देण्यात यायचे. सामान्य नागरिकांसोबतच हज यात्रेसाठी जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेता ही वाढ करण्यात आली आहे.
उपराजधानीच्या सादिकाबाद येथे प्रदेशातील एकमेव पासपोर्ट सेवा केंद्र आहे. येथे राज्यातील १७ जिल्ह्यांतून अर्जदार पोहोचतात. ‘अपॉईन्टमेन्ट’च्या निर्धारित संख्येहून जास्त प्रमाणात ‘आॅनलाईन’ अर्ज करण्यात येत आहेत. त्यामुळेच एका अर्जदाराला सरासरी १० दिवसांची प्रतीक्षा करावी लागत होती. आता ५० ‘टोकन’ वाढविण्यात आल्यामुळे थोडाफार दिलासा नक्कीच मिळेल. (प्रतिनिधी)
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. अनेक कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज करताना पासपोर्ट आवश्यक असणे हे याचे महत्त्वाचे कारण आहे. कंपन्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण किंवा इतर कामांसाठी विदेशात पाठवितात. त्यामुळे मुलाखतीच्या अगोदरच पासपोर्ट आहे की नाही याची विचारणा करण्यात येते. त्यामुळेच अभियांत्रिकीचे विद्यार्थी याबाबतीत दक्ष दिसून येतात.
विदेशात नोकरीचे प्रमाण वाढीस
विदेशात नोकरीसाठी असणारा कल हेदेखील पासपोर्ट काढणाऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याचे महत्त्वाचे कारण आहे. २०१४ मध्ये जवळपास ९० हजार पासपोर्ट तयार करण्यात आले. २०१३ च्या तुलनेत हा आकडा १५ टक्के अधिक आहे. हजसाठी सुरू असलेली प्रक्रिया पाहता ‘टोकन’ संख्या वाढविण्यात आली आहे. शिवाय विद्यार्थीदेखील शिक्षण घेत असतानाच पासपोर्ट काढून ठेवतात. शिवाय विदेशात नोकरीवर असणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबीयांचीदेखील पासपोर्ट तयार करण्यासाठी गर्दी होते. पासपोर्टच्या कामाचा वेग वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहे अशी माहिती पासपोर्ट अधिकारी सी.एल.गौतम यांनी दिली.