२०२८ पर्यंत ५०० गिगावॅट नवीकरणीय ऊर्जानिर्मितीचे लक्ष्य :भरत भार्गव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 11:27 PM2019-02-21T23:27:13+5:302019-02-21T23:30:08+5:30
जीवाश्म इंधनाच्या उपयोगामुळे प्रदूषणाची वाढ होत आहे. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी नवीकरणीय ऊर्जास्रोतांवर भर देण्याची गरज आहे. २०२८ पर्यंत देशात ५०० गिगावॅट नवीकरणीय ऊर्जानिर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यातूनच २०३० पर्यंत गैरजीवाश्म इंधनातून ४० टक्के वीजनिर्मिती करणे शक्य होईल, असे प्रतिपादन ‘ओएनजीसी एनर्जी सेंटर’चे महासंचालक डॉ.भरत भार्गव यांनी व्यक्त केले. ‘सीएसआयआर-नीरी’तर्फे ‘ऊर्जा, वायुप्रदूषण व वातावरण बदल’ या विषयावर तज्ज्ञांच्या उपस्थितीत मंथन झाले. यावेळी ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जीवाश्म इंधनाच्या उपयोगामुळे प्रदूषणाची वाढ होत आहे. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी नवीकरणीय ऊर्जास्रोतांवर भर देण्याची गरज आहे. २०२८ पर्यंत देशात ५०० गिगावॅट नवीकरणीय ऊर्जानिर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यातूनच २०३० पर्यंत गैरजीवाश्म इंधनातून ४० टक्के वीजनिर्मिती करणे शक्य होईल, असे प्रतिपादन ‘ओएनजीसी एनर्जी सेंटर’चे महासंचालक डॉ.भरत भार्गव यांनी व्यक्त केले. ‘सीएसआयआर-नीरी’तर्फे ‘ऊर्जा, वायुप्रदूषण व वातावरण बदल’ या विषयावर तज्ज्ञांच्या उपस्थितीत मंथन झाले. यावेळी ते बोलत होते.
‘नीरी’च्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला ‘नीरी’चे संचालक डॉ.राकेश कुमार, मुख्य वैज्ञानिक डॉ.जे.एस.पांडे, डॉ.नितीन लाभसेटवार, ‘स्कील कौन्सिल फॉर ग्रीन जॉब्स’च्या सल्लागार डॉ.परवीन धमीजा, ‘बीएआरसी’च्या पर्यावरण देखरेख विभागाचे प्रमुख डॉ.ए.विनोद कुमार, ‘आयआयटी-कानपूर’चे प्रा.अविनाश कुमार अग्रवाल प्रामुख्याने उपस्थित होते. नवीकरणीय ऊर्जानिर्मितीचे उद्दिष्ट गाठत असताना याचे समाजावर काय परिणाम होतील हेदेखील जाणून घेतले पाहिजे. एकावेळी दोन किंवा अधिक ऊर्जास्रोतांचा उपयोग भविष्यासाठी फायदेशीर ठरेल, असे मत डॉ.भार्गव यांनी व्यक्त केले. ‘बायोमास’ ऊर्जेचा एक स्वच्छ स्रोत ठरू शकतो. त्यावर लक्ष द्यायला हवे. ‘बायोमास’पासून ऊर्जानिर्मितीसाठी प्रभावी तंत्रज्ञान तसेच जनजागृती वाढविण्याची गरज आहे, असे डॉ.परवीन धमिजा यांनी सांगितले. भारतात सद्यस्थितीमध्ये केवळ ४ टक्के अणुउर्जेचा उपयोग होत आहे. अणुऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी जास्त प्रयत्न करायला हवे, असे आवाहन डॉ.ए.विनोद कुमार यांनी केले. दळणवळण क्षेत्रात प्रदूषणविरहित इंधनाचा उपयोग झाला पाहिजे. सोबतच बॅटरीच्या कचऱ्याचेदेखील योग्य व्यवस्थापन झाले पाहिजे, असे प्रा.अविनाश कुमार यांनी सांगितले. यावेळी ‘द एनर्जी अॅन्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट’चे डॉ.अरिंदम दत्ता यांनी केंद्र शासनाच्या ‘कुसुम’ या योजनेबाबत माहिती दिली.
डॉ.मिलिंद चित्तावार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपविभागीय अधिकारी हेमा देशपांडे, ‘आयआयटी-कानपूर’च्या प्रा.अनुभा गोयल, ‘एनआयटी-वारांगल’चे डॉ.सुमंथ चिंथला, डॉ.जे.एस.पांडे, ‘आयआयटी-दिल्ली’चे प्रा.एस.के.दास, डॉ.प्रियदर्शिनी कर्वे, डॉ.कार्थिक बालसुंदरम्, डॉ.सुनील पांडे यांनीदेखील यावेळी मार्गदर्शन केले.
तत्पूर्वी स्वागत भाषणादरम्यान डॉ.राकेश कुमार यांनी ‘डाटा’च्या आधारावर जास्तीत जास्त ‘फिल्ड’मध्ये अंमलबजावणीवर भर देण्यात यावा, असे प्रतिपादन केले. असे करत असताना तंत्रज्ञान तसेच विविध मुद्यांवर ‘नीरी’तर्फे नक्कीच सहकार्य करण्यात येईल, असे ते म्हणाले. डॉ.लाभसेटवार यांनी प्रास्ताविक केले. हेमंत भेरवानी यांनी संचालन केले. डॉ.के.व्ही.जॉर्ज, अंकित गुप्ता, अनिल भनारकर, सुवहा लामा यांनी आयोजनासाठी परिश्रम घेतले.