५०० विद्यार्थ्यांवर टांगती तलवार

By admin | Published: September 11, 2016 02:24 AM2016-09-11T02:24:57+5:302016-09-11T02:24:57+5:30

स्थानिक डॉ. हरिभाऊ आदमने कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वीरेंद्र जुमडे यांची लैंगिक छळप्रकरणी प्राचार्यपदाची मान्यता काढून घेण्यात आली

500 students hanging sword | ५०० विद्यार्थ्यांवर टांगती तलवार

५०० विद्यार्थ्यांवर टांगती तलवार

Next

परीक्षा अर्ज स्वीकारण्यास विद्यापीठाचा नकार : हरिभाऊ आदमने कॉलेजमधील प्रकार
सावनेर : स्थानिक डॉ. हरिभाऊ आदमने कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वीरेंद्र जुमडे यांची लैंगिक छळप्रकरणी प्राचार्यपदाची मान्यता काढून घेण्यात आली. त्यातच विद्यापीठाच्या उपकुलसचिवांनी या कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज स्वीकारण्यास तसेच विद्यार्थ्यांचे नोंदणी अर्ज (एन्रॉलमेंट फॉर्म) स्वीकारण्यास नकार दिल्याने या कॉलेजमधील ५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विद्यापीठ प्रशासनाने प्राचार्य जुमडे यांना पदमुक्त करण्यासंदर्भात कारण दाखवा नोटीस बजावली होती. जुमडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याने या आदेशाला न्यायालयाने स्थागिती दिली. त्यातच विद्यापीठाने जुमडे यांच्या स्वाक्षरीच्या व्यवहारांवर प्रतिबंध घातला होता. मात्र, त्यांच्या स्वाक्षरीचे पत्रव्यवहार सुरूच ठेवण्यात आले. त्यांच्या स्वाक्षरीची कर्मचाऱ्यांची पगार देयके मंजूर न करता परत पाठविण्यात आल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे.
कॉलेजने ५०० विद्यार्थ्यांचे नोंदणी अर्ज (एन्रॉलमेंट फॉर्म) व परीक्षा अर्ज ७ सप्टेंबर रोजी विद्यापीठाकडे मंजुरीसाठी पाठविले. त्यावर उपकुलसचिव (अतिकार्य) प्रदीप बिनिवाले यांनी ८ सप्टेंबर रोजी कॉलेजला पत्र पाठवून कळविले की, या विद्यापीठाने वीरेंद्र जुमडे यांची प्राचार्यपदाची मान्यता १५ जुलै रोजी रद्द केली आहे. या अंतरिम आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे जुमडे प्राचार्यपदी कार्यरत नसल्याने येथील प्राचार्यपद रिक्त आहे. परिणामी, सेवाज्येष्ठनुसार कार्यकारी प्राचार्य नियुक्तीचा प्रस्ताव मान्यतेसाठी त्वरित सादर करावा. कार्यकारी प्राचार्यांना मान्यता मिळाल्यानंतर त्यांच्या स्वाक्षरीने विद्यार्थ्यांचे एन्रॉलमेंट फॉर्म व परीक्षा अर्ज विद्यापीठाकडे मंजुरीसाठी पाठवावे, असेही या पत्रात नमूद केले आहे.
परिणामी, या पत्रामुळे विद्यार्थ्यांना एन्रॉलमेंट नंबर न मिळाल्यास त्यांना परीक्षेला बसता येणार नसल्याने त्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)

१४ सप्टेंबर अंतिम तारीख
या विद्यार्थ्यांचे एन्रॉलमेंट फॉर्म व परीक्षा अर्ज विद्यापीठाकडे १४ सप्टेंबरपर्यंत पाठविणे गरजेचे आहे. या विद्यार्थ्यांची आॅक्टोबरमध्ये प्रथम वर्षाची परीक्षा आहे. त्यांना नोंदणी क्रमांक (एन्रॉलमेंट नंबर) प्राप्त न झाल्यास त्यांचे परीक्षा अर्ज स्वीकारले जाणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही. विद्यापीठ प्रशासनाने तसे निर्देश देऊनही शिक्षण संस्था प्राचार्य जुमडे यांना पाठीशी घालत कार्यकारी प्राचार्य नियुक्तीला दिरंगाई करीत आहे. याचा फटका केवळ विद्यार्थ्यांनाच बसणार आहे.

शिक्षण संस्थेचे
संलग्नीकरण रद्द करू
कार्यकारी प्राचार्याच्या नियुक्तीबाबत शिक्षण संस्थेला सूचना दिली आहे. शिक्षण संस्थेचे या सूचनेचे पालन न केल्यास या शिक्षण संस्थेचे विद्यापीठाशी असलेले संलग्नीकरण रद्द करावे लागेल. त्यामुळे महाविद्यालयाचे नाव विद्यापीठाच्या यादीतून कमी होईल. २०१६ च्या उन्हाळी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे हिवाळी परीक्षेचे अर्ज जुमडे यांच्या स्वाक्षरीने स्वीकारण्यात आले होते. या संदर्भात महाविद्यालयाला विचारणा केली होती. जुमडे यांच्या स्वाक्षरीचा पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नसल्याचे कॉलेजला कळविले होते.
- डॉ. सिद्धार्थविनायक काणे,
कुलगुरू, रा. तु. म. नागपूर विद्यापीठ

Web Title: 500 students hanging sword

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.