डेंग्यूच्या अळ्या आढळल्यास ५ हजार दंड : नागपूर महापौरांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 10:57 PM2019-02-26T22:57:27+5:302019-02-26T22:58:31+5:30
शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. जनजागृती करूनही नागरिक घर व परिसरात स्वच्छता ठेवत नाही. यामुळे डेंग्यू डासांची उत्पत्ती होते. याला आळा घालण्यासाठी डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्यास संबंधिताना १०० ते २०० रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अद्याप या निर्णयाला शासनाकडून मंजुरी मिळालेली नाही. असे असतानाही महापौर नंदा जिचकार यांनी मंगळवारी सर्वसाधारण सभेत डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्यास संबंधित घरमालक वा व्यापाऱ्याला ५ हजार रुपये दंड आकारण्याचे निर्देश दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. जनजागृती करूनही नागरिक घर व परिसरात स्वच्छता ठेवत नाही. यामुळे डेंग्यू डासांची उत्पत्ती होते. याला आळा घालण्यासाठी डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्यास संबंधिताना १०० ते २०० रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अद्याप या निर्णयाला शासनाकडून मंजुरी मिळालेली नाही. असे असतानाही महापौर नंदा जिचकार यांनी मंगळवारी सर्वसाधारण सभेत डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्यास संबंधित घरमालक वा व्यापाऱ्याला ५ हजार रुपये दंड आकारण्याचे निर्देश दिले.
शहरातील डेंग्यूचा वाढता प्रकोप विचारात घेता महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे गेल्या वर्षी जनजागृती मोहीम राबविण्यात आली होती. परंतु परंतु रॅलीला हिरवी झेंडी दाखवणाऱ्या लोकांच्या घरातच डेंग्यूच्या अळ्या सापडत असल्याचे झोनच्या कर्मचाऱ्यांनी निदर्शनास आणले होते.
सभागृहात श्रद्धा पाठक यांनी डेंग्यूचा मुद्दा उपस्थित केला. ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनीही यावर ठोस निर्णयाची मागणी केली. याचा विचार करता महापौरांनी डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्यास संबंधिताना ५ हजारांचा दंड आकारण्याचे निर्देश दिले. मात्र आधीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असताना दुसऱ्या प्रस्तावाला मंजुरी कधी मिळणार असा प्रश्न आहे.
निर्देशानंतरही दूषित पाण्याची समस्या कायम
महापौरांनी दूषित पाण्याची समस्या सात दिवसात निकाली काढण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले होते. मात्र त्यानंतरही प्रभाग २१ मधील समस्या सुटलेली नाही. सभागृहात पाण्यावर चर्चा होण्याची अपेक्षा होती. मात्र पाणी समस्याबाबत महापौर गंभीर नसल्याचा आरोप नगरसेविका आभा पांडे यांनी केला. शहरातील सर्व भागात समान पाणी वितरणाची घोषणा वारंवार करण्यात आली. मात्र त्याची अंमलजावणी होत नाही. चार झोनमध्ये पाणी समस्या आहे. उन्हाळ्याच्या दिवसात ही समस्या गंभीर होणार असल्याचे पांडे यांनी सांगितले.