पाच हजार अनुयायांनी घेतली बौद्ध धम्माची दीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 09:34 PM2018-10-16T21:34:06+5:302018-10-16T21:38:58+5:30
६२व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्यानिमित्ताने हातात पंचशील ध्वज अन् शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या निळ्या पाखरांनी दीक्षाभूमी फुलू लागली आहे. मंगळवारी सकाळी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात बौद्ध धम्माच्या दिक्षेला सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी पाच हजार अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. सलग तीन दिवस हा सोहळा दीक्षाभूमीवर चालणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ६२व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्यानिमित्ताने हातात पंचशील ध्वज अन् शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या निळ्या पाखरांनी दीक्षाभूमी फुलू लागली आहे. मंगळवारी सकाळी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात बौद्ध धम्माच्या दिक्षेला सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी पाच हजार अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. सलग तीन दिवस हा सोहळा दीक्षाभूमीवर चालणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या मार्गदर्शनात दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा सोहळा आयोजित केला जातो. दरवर्षी सुमारे १२ ते १५ हजारावर लोक बौद्ध धम्माची दीक्षा घेतात. यावर्षी १६ ते १८ आॅक्टोबर या कालावधीत दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्याच्या आज पहिल्याच दिवशी पाच हजार लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. यात तरुणांसोबतच महिलांचाही मोठा सहभाग होता. भदंत ससाई यांच्या नेतृत्वात भंते नागघोष, भंते नागसेन, भंते धम्मप्रकाश, भंते नागधम्म यांनी अनुयायांना त्रिशरण, पंचशील आणि २२ प्रतिज्ञा देऊन बौद्ध धम्माची दीक्षा दिली.
धम्मदीक्षा घेणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, तेलंगाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यातील अनुयायांचा समावेश होता. बौद्ध धम्माची दीक्षा घेणाऱ्यांकडून धर्मांतरण करण्याबाबत एक प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात आले. यात त्याचे नाव, गाव पत्ता, कोणता धर्म सोडून बौद्ध धम्माची दीक्षा घेत आहे, याबाबतची माहिती आहे. दीक्षार्थीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने बौद्ध दीक्षा प्रमाणपत्र देण्यात आले. या सोहळ्याकडे स्मारक समितीचे विलास गजघाटे हे विशेष लक्ष ठेवून आहेत. या सोहळ्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ता रवी मेंढे हे विशेष परिश्रम घेत आहेत.