नागपुरात गांधीजींवर १६३ देशांचे ५००० वर टपाल साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 08:25 PM2018-10-12T20:25:02+5:302018-10-12T20:31:58+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे महात्म्य केवळ भारतातच नव्हे तर जगभरात मान्य केले जाते. त्यामुळेच कोणत्याही देशाचे राष्ट्रीय प्रतीक समजल्या जाणाऱ्या टपाल साहित्यावर या महात्म्याला स्थान दिले आहे. जगभरातील १६३ देशांनी या अहिंसेच्या पुजाऱ्यावर ५००० पेक्षा अधिक टपाल तिकिटे, स्टॅम्प, पोस्टकार्ड आदी प्रकाशित करून त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली आहे. भारतावर १५० वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटनचेही त्यांच्या राजघराण्याव्यतिरिक्त पहिल्या नेत्याचे तिकीट होते ते महात्मा गांधी यांचेच. भारतासह जगभरात प्रकाशित झालेल्या अशा दुर्मिळ टपाल साहित्य, नाणी, नोटा यांचे प्रदर्शन जीपीओच्या फिलाटेली विभागात लावण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे महात्म्य केवळ भारतातच नव्हे तर जगभरात मान्य केले जाते. त्यामुळेच कोणत्याही देशाचे राष्ट्रीय प्रतीक समजल्या जाणाऱ्या टपाल साहित्यावर या महात्म्याला स्थान दिले आहे. जगभरातील १६३ देशांनी या अहिंसेच्या पुजाऱ्यावर ५००० पेक्षा अधिक टपाल तिकिटे, स्टॅम्प, पोस्टकार्ड आदी प्रकाशित करून त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली आहे. भारतावर १५० वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटनचेही त्यांच्या राजघराण्याव्यतिरिक्त पहिल्या नेत्याचे तिकीट होते ते महात्मा गांधी यांचेच. भारतासह जगभरात प्रकाशित झालेल्या अशा दुर्मिळ टपाल साहित्य, नाणी, नोटा यांचे प्रदर्शन जीपीओच्या फिलाटेली विभागात लावण्यात आले.
नागपूर फिलाटिक्स सोसायटीच्यावतीने आंतरराष्ट्रीय फिलाटेली दिनानिमित्त जीपीओच्या राजहंस सभागृहात हे प्रदर्शन लावण्यात आले आहे. महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त त्यांना हे प्रदर्शन समर्पित असून शहरातील टपाल साहित्य संग्राहकांनी त्यांच्या संग्रहातील गांधीजींवरील दुर्मिळ टपाल साहित्य येथे मांडले आहेत. स्टॅम्प, तिकिटा, लिफाफे, आंतरदेशीय पत्र, युनिक आर्टिकल्स, कॅन्सलेशनसह असलेले कव्हर, नाणी, भारतीय व आंतरराष्ट्रीय करन्सी आदी दुर्मिळ गोष्टी या प्रदर्शनात पाहता येतात. फिलाटेली सोसायटीचे संस्थापक जयंत खेडकर यांनी माहिती देताना सांगितले, ७५ वर्षाचे सर्वात वरिष्ठ संग्राहक सुधाकर सोनार यांच्यापासून सर्वात लहान संग्राहक कीर्ती दुबे यांनी संग्रहित केलेल्या वस्तू या प्रदर्शनात सादर करण्यात आल्या. स्वत: खेडकर यांनी गांधीजींवरील शुद्ध चांदीचे तिकीट, स्वित्झर्लंड सरकारने प्रकाशित केलेले तिकीट व इतर साहित्य येथे ठेवले. यासह रूपकिशोर कनोजिया यांचे अमेरिका, इंग्लंड, ताजकिस्तान, शारजाह, युनान, नायजेरिया आदी २५ देशांनी गांधीजींवर काढलेले टपाल साहित्य आणि करन्सी प्रदर्शनात मांडल्या. याशिवाय गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त भारत सरकारने पहिल्यांदा काढलेले गोल तिकीट, नाणे विशेषज्ञ रामसिंग ठाकूर यांचे आतापर्यंत निघालेली दुर्मिळ नाणी, कपिल बन्सोड यांनी संग्रहित केलेले गांधीजी व सहकाºयांचे टपाल साहित्य, अनिल मेश्राम यांचे विविध चित्रांवर स्टॅम्प व कव्हर लावून माहिती सादर केलेले प्रदर्शन, नितीन बक्षी, विजय पटेल आदी संग्राहकांचे १५०० च्यावर टपाल साहित्य, नाणी, नोट आणि कॅन्सलेशन स्टॅम्प या प्रदर्शनात मांडण्यात आले.
गांधीजींच्या हत्येनंतर १९४८ साली पहिल्यांदा त्यांच्यावर डाक तिकीट भारत सरकारने काढले होते. नेमके त्याच वर्षी इंग्लंड व स्वित्झर्लंड सरकारनेही त्यांच्यावर डाक तिकीट काढले. अशी दुर्मिळ तिकिटे, स्टॅम्प तसेच महात्मा गांधी यांच्या दक्षिण आफ्रिकेतील लढ्यापासून भारतात आगमन, चंपारण्य सत्याग्रह, दांडीयात्रा, स्वातंत्र्य लढ्यातील अनेक प्रसंग, चले जाओ चळवळ, गोलमेज परिषद, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यासह आंतरराष्ट्रीय नेत्यांसोबत चर्चा करतानाचे तिकीटे, पोस्टकार्ड, कव्हरपेज असे सर्व दर्शविणारा हा संग्रह लक्ष वेधणारा ठरला. शाळकरी विद्यार्थ्यांसाठी विशेष भेट आणि प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.