ऊर्जानिर्मिती क्षेत्रात ५० हजार कोटींचे करार; दावोसच्या जागतिक आर्थिक परिषदेत विकासाला दिशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2022 08:01 PM2022-05-28T20:01:21+5:302022-05-28T20:02:01+5:30
Nagpur News दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत ऊर्जानिर्मिती क्षेत्रात ५० हजार कोटींचे करार करण्यात आले. रिन्यू पॉवर प्रायव्हेट लिमिटेड आणि महावितरण यांच्यात या विषयीचा सामंजस्य करार झाला.
नागपूर : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत ऊर्जानिर्मिती क्षेत्रात ५० हजार कोटींचे करार करण्यात आले. रिन्यू पॉवर प्रायव्हेट लिमिटेड आणि महावितरण यांच्यात या विषयीचा सामंजस्य करार झाला. या गुंतवणुकीमुळे राज्याला भविष्यात रोज २०० मेगावॅट वीज प्राप्त होईल. तसेच ३० हजार लोकांना रोजगार लाभेल. येत्या सात वर्षात ही गुंतवणूक केली जाणार असून एक खिडकीच्या माध्यमातून प्रकल्प उभारणीसाठी मदत केली जाणार आहे.
दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यटन विकासमंत्री आदित्य ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत सहभागी झाले होते. यावेळी महावितरणचे सीएमडी विजय सिंघल आणि रिन्यू पॉवरचे सीएमडी सुमंत सिन्हा यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक खेचून आणण्याच्या आपल्या प्रयत्नांना मोठे यश लाभले. याद्वारे राज्यात दहा ते १२ हजार मेगावॅट ऊर्जा निर्माण होणार आहे, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले.
याशिवाय इंडोनेशियाच्या एशिया पल्प अँड पेपर कंपनीने रायगड जिल्ह्यात सुमारे १.५ बिलियन यूएसडी गुंतवणुकीसाठी करार केला. याशिवाय वेदांता ग्रुपचे संचालक अनिल अग्रवाल यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणाऱ्या बॅटरीसंबंधी अमरा राजा ग्रुपचे संचालक जय गल्ला यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. दरम्यान, राज्य सरकारने राज्यातील दुर्गम भागातील शाळांमध्ये आणि मुंबईतील महापालिका शाळांमध्ये डिजिटल सामग्री सादर करण्यासाठी बायजूस यांच्यासोबत सामंजस्य करार केला.
विदर्भात ३५०० कोटींची गुंतवणूक
- दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत झालेल्या करारांनुसार विदर्भात सुमारे ३ हजार ५७८ कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे. यात इंडोरामा ६० ० कोटी, जीआर कृष्णा फेर्रो एलॉयज ७४० कोटी, कलरशाइन इंडिया ५१० कोटी, कार्निव्हल इंडस्ट्रीज २०७ कोटी, गोयल प्रोटिन्स ३८० कोटी, अल्फ्रोज इंडस्ट्रीज १५० कोटी व विश्वराज एन्व्हायर्नमेंट एक हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.