सात हजारांवरील पात्र लाभार्थ्यांना भूखंडासाठी ५० हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:08 AM2021-01-22T04:08:32+5:302021-01-22T04:08:32+5:30
लाोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्ह्यात अनेक लोक घरकुलाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु त्यांच्या नावावर भूखंड नाही. अशांना पंडित ...
लाोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात अनेक लोक घरकुलाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु त्यांच्या नावावर भूखंड नाही. अशांना पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत ५० हजारांचे अर्थसहाय्य करण्यात येते. जिल्ह्यात असे ७,३७५ पात्र लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांनी व्यक्तिगत किंवा लाभार्थ्यांचा गट तयार करून गावामध्ये घरकुलासाठी जागा खरेदी करावी. त्यासाठी प्रशासन पूर्णपणे सहकार्य करेल, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी संयुक्त पत्रपरिषदेत दिली.
त्यांनी सांगितले की, घरकुल योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ४१,७३२ घरकुल मंजूर असून, यापैकी २१,६१८ घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या घरकुलाच्या अंमलबजावणीसाठी राज्यात २० नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी या १०० दिवसांच्या कालावधीत महाआवास अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मंजूर घरकुलांची कामे पूर्ण केली जातील. सोबतच ज्यांच्याकडे जागा नाही, अशांना जागा खरेदीसाठी मदत केली जाईल. पंतप्रधान आवास योजना व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेंतर्गत ज्या पात्र लाभार्थ्यांस घरकुल बांधकामासाठी स्वत:ची जागा उपलब्ध नाही. अशा लाभार्थ्यांची निवड या योजनेत करण्यात येते. लाभार्थी निवडीसाठी गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यास ५०० चौ.फुटापर्यंत जागा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येते. मोठ्या ग्रामपंचायती किंवा शहराशेजारील ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार २ मजली (जी प्लस १) ३ मजली (जी प्लस २) इमारतीच्या भूखंडासाठी प्रति लाभार्थ्यास अर्थसहाय्य देण्यात येते. जिल्ह्यातील ६४० गावांमध्ये ७,३७५ असे लाभार्थी आहेत. या गावातील शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन जागा उपलब्ध करून दिल्यास त्यांना प्रशासनाकडून अकृषक करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, अशी हमी त्यांनी यावेळी दिली.
बॉक्स
असे आहेत तालुकानिहाय लाभार्थी
भिवापूर १३५, हिंगणा- २३८, कळमेश्वर- २४९, कामठी- ८०५, काटोल- ८३३, कुही ३१०, मौदा- १०७६, नागपूर (ग्रा.)-४६७, नरखेड १५५७, पारशिवनी- ३५१, रामटेक- १७४, सावनेर- ७४६, उमरेड ४३४