लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात ५१,८२० मतदार वाढले
By गणेश हुड | Published: August 6, 2024 09:23 PM2024-08-06T21:23:48+5:302024-08-06T21:24:07+5:30
विधानसभा निवडणूक प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध : जिल्ह्यात मतदान केंद्राची संख्या ४ हजार ६१०
गणेश हूड/ नागपूर, लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीनंतर आयोगाने राबविलेल्या मतदार नोंदणी अभियानात जिल्ह्यात ५० हजार ८२० नवीन मतदार वाढले आहेत. त्यांची प्रारूप मतदार यादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यात मतदान केंद्रांची संख्या ४ हजार ६१० झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सप्टेंबरमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने आवश्यक जिल्ह्याची प्रारूप मतदारयादी जिल्हा निवडणूक विभागाने तयार केली आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी एकूण मतदारांची संख्या ४२ लाख ७२ हजार ३६६ होती. त्यात वाढ होऊन ती आता ४३ लाख २४ हजार १८६ झाली आहे. ३० ऑगस्टला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ५ जानेवारी २०२४ ला प्रसिद्ध यादीनुसार ४१ लाख १६ हजार ८४३ मतदारांची नोंद करण्यात आली. याचा विचार करता तुलनेत यंदा दोन लाख ७ हजार ३४३ नवमतदारांची नोंद करण्यात आली आहे. तत्पूर्वी, राजकीय पक्षांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रारूप यादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. यावर ६ ते २० ऑगस्ट या कालावधीत दावे व हरकती मागविल्या आहेत. २९ ऑगस्टपर्यंत यावर निर्णय घेण्यात येईल. ३०ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
१३६ मतदान केंद्रे वाढले
मतदारांची संख्या वाढत असताना मतदान केंद्रेही वाढली आहेत. जिल्ह्यात एकूण चार हजार ४७४ मतदान केंद्रे आहेत. यात आता १३६ मतदान केंद्रे वाढली असून, एकूण चार हजार ६१० मतदान केंद्रांवर मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. यात कामठीमध्ये सर्वाधिक ५२४ तर सर्वात कमी मध्य नागपुरात ३०८ मतदान केंद्र आहेत.
फ्लॅट स्कीममध्ये ११ मतदान केंद्र
भारत निवडणूक आयोगाच्या १९ जुलै २०२४ च्या आदेशानुसार जिल्ह्यातील उच्च इमारती व गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ११ मतदान केंद्रे तर झोपडपट्टी परिसरात ९ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.