लाखमोलाचे ५२ जावई !
By admin | Published: April 13, 2016 03:01 AM2016-04-13T03:01:12+5:302016-04-13T03:01:12+5:30
लाख चकरा मारल्यानंतरही अनुकंपाधारकांना विद्यापीठात नोकरी मिळत नाही.
निवृत्तांसाठी तिजोरी; अनुकंपाधारकांशी मुजोरी : ६९ लाख रुपयांचे आऊटपुट काय ?
जितेंद्र ढवळे नागपूर
लाख चकरा मारल्यानंतरही अनुकंपाधारकांना विद्यापीठात नोकरी मिळत नाही. मात्र लाखमोलाच्या ५२ जावई (सेवानिवृत्त) कर्मचाऱ्यांवर वर्षाला ६९ लाख रुपयांची उधळपट्टी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून केली जात आहे. या कर्मचाऱ्यांचे नेमके आऊटपुट काय? त्यांनी कामात चुका केल्यातरी कोणतीही कारवाई नाही, याबाबत स्पष्ट धोरण नसल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची फौज विद्यापीठ प्रशासनाच्या डोक्यावर बसत आहे.
अंतर्गत राजकारणामुळे विद्यापीठात पदभरती बंद आहे. कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी प्रशासन गतिमान करण्याचा संकल्प केला असला तरी त्यांच्या ‘गती’वर बाण चालला आहे. त्यामुळे प्रशासनावर येत असलेल्या भाराचे कारण देत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भरणा गत दोन वर्षांपासून केला जात आहे. ही संख्या आता ५२ वर पोहोचली आहे. याउलट पदभरतीची कोंडी कशी फोडता येईल, याबाबत प्रशासन गप्प आहे. पदभरती फाईल बंद करण्यात आल्या आहेत. विद्यापीठात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना परत सेवेत समावून घेण्याचा निर्णय तत्कालीन व्यवस्थापन परिषदेने घेतला होता.
गुणवंतांना प्राधान्य का नाही ?
सेवानिवृत्तीनंतर व्यक्तीची काम करण्याची क्षमता कमी होते. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे काम तर जास्त आऊटपुटचे आहे. मात्र ज्यांनी आयुष्यभर संगणक हाताळला नाही ते कर्मचारी पेपरलेस प्रशासनात काम कसे करणार, यावर चिंतन होणे गरजेचे आहे. विविध विभागात जे सेवानिवृत्त कर्मचारी सध्या कार्यरत आहेत त्यांच्या कामाचे स्वरूप काय आहे ? ते त्यास तितका वेळ देतात का ? हे तपासण्याची गरज आहे. याउलट कमवा आणि शिका योजनेंतर्गत पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांना विद्यार्थ्यांना प्रशासकीय कामांचा अनुभव देता येईल का किंवा कमवा आणि शिका योजनेची व्याप्ती वाढवता येईल का, यावर मंथन होणे गरजेचे आहे.