वर्षभरात ५२ हजार प्रवासी रेल्वेगाड्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:06 AM2021-06-05T04:06:30+5:302021-06-05T04:06:30+5:30
नागपूर : लॉकडाऊन आणि कोरोनाच्या धास्तीने असंख्य प्रवाशांनी प्रवास टाळला. प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद असल्यामुळे रेल्वेगाड्या रद्द करण्याची पाळी आली. ...
नागपूर : लॉकडाऊन आणि कोरोनाच्या धास्तीने असंख्य प्रवाशांनी प्रवास टाळला. प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद असल्यामुळे रेल्वेगाड्या रद्द करण्याची पाळी आली. १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या वर्षभराच्या काळात नागपूर विभागातून धावणाऱ्या ५२ हजार ८५२ प्रवासी रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मागविलेल्या माहितीतून ही आकडेवारी समोर आली आहे. कोरोनाने देशात शिरकाव करताच २४ मार्च २०२० पासून भारतीय रेल्वेने प्रवासी वाहतूक बंद केली. संपूर्ण एप्रिल महिन्यात एकही प्रवासी रेल्वेगाडी धावली नाही. परप्रांतीय श्रमिकांना त्यांच्या राज्यापर्यंत सोडून देण्यासाठी मे महिन्यात श्रमिक स्पेशल एक्सप्रेस चालविण्यात आल्या. जून महिन्यापासून मोजक्या विशेष एक्सप्रेस सुरू करण्यात आल्या. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून पुन्हा रेल्वेगाड्यांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आली. १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या वर्षभराच्या काळात नागपूर विभागातून धावणाऱ्या ३७ हजार ३६१ एक्सप्रेस व १५ हजार ४९१ पॅसेंजर अशा एकूण ५२ हजार ८५२ प्रवासी रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. तर, याच काळात नागपूर विभागातून नऊ हजार ९८० एक्सप्रेस व दोन हजार ८०२ पॅसेंजर अशा एकूण १२ हजार ७८२ प्रवासी रेल्वेगाड्या धावल्या. त्यांतून १८ लाख ७२ हजार प्रवाशांनी प्रवास केला. त्यांच्याकडून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला १२२ कोटींचा महसूल प्राप्त झाला असून, वर्षभरात नऊ लाखांहून अधिक प्रवाशांनी रेल्वे तिकीट रद्द केले. त्यांच्याकडून तिकीट कॅन्सलेशन चार्जसपोटी रेल्वेला ७.८९ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.