नागपुरात ५३ टक्के मतदान
By admin | Published: February 22, 2017 02:24 AM2017-02-22T02:24:20+5:302017-02-22T02:24:20+5:30
महापालिका निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक विभागाने गेल्या काही दिवसापासून जनजागृतीवर भर दिला होता.
मतदान शांततेत : टक्केवारी फारशी वाढली नाही
नागपूर : महापालिका निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक विभागाने गेल्या काही दिवसापासून जनजागृतीवर भर दिला होता. परंतु प्रयत्नानंतरही नागपूर शहरातील मतदानाची टक्केवारी फारशी वाढलेली नाही. परंतु २०१२ च्या निवडणुकीच्या तुलनेत अधिक असून सरासरी ५३ टक्के मतदान झाले आहे. ईव्हीएमचा घोळ व काही तुरळक घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. यासोबतच महापालिकेच्या १५१ जागांसाठी रिंगणात असलेल्या ११३५ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. गुरुवारी या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे.
नागपूर शहरात २० लाख ९३ हजार ३९२ मतदार असून यातील ५३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ५२ हजारच्या आसपास नवीन मतदार आहेत.
नागपुरात सकाळी पहिल्या दोन तासात ९.३० पर्यंत ८.६३ टक्के,११.३० पर्यंत १९.९५ टक्के, दुपारी १.३० पर्यंत ३१.२२ टक्के, दुपारी ३ .३० पर्यत ४३ टक्के तर सायंकाळी ५.३० पर्यत सरासरी ५३ टक्के मतदान झाले. पहिल्या टप्प्यात सकाळी ७.३० ते ९.३० या दोन तासात केवळ ८.६३ टक्के मतदान झाले. त्यानंतरच्या सहा तासात म्हणजे दुपारी ३.३० पर्यत ३४.३७ टक्के मतदान झाले. शेवटच्या दोन तासात ५.३० पर्यत १० टक्के मतदान झाले. म्हणजेच सुरुवातीचे दोन व शेवटचे दोन अशा चार तासात १८.६३ टक्के मतदान झाले.
सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सुुरुवातीला मतदारांची गर्दी नव्हती. मात्र ११.३० नंतर मतदानाचा वेग वाढत गेला. सायंकाळी अखेरच्या दोन तासात अनेक मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे सायंकाळी ५.३० नंतरही रांगेत उभ्या असलेल्या मतदारांनी मतदान केले. त्यामुळे रात्री उशिरापर्यत प्रभागनहिाय मतदानाची टक्केवारी गोळा करण्याचे काम सुरू होते.(प्रतिनिधी)
निवडणुकीतील व्यस्त कर्मचारी आज मतदान करणार
निवडणूक प्रक्रियेत व्यस्त असलेले कर्मचारी व अधिकारी आपल्या मतदानाचा हक्क आज बजावणार आहे. बुधवारी दिवसभर तसेच गुरुवारी सकाळी १० पर्यंत पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून ते आपल्या पसंतीच्या उमेदवारांना मतदान करू शकतात. निवडणुकीतील कर्मचाऱ्यांना मागणीनुसार पोस्टल बॅलेट उपलब्ध करण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त (निवडणूक) महेश धामेचा यांनी दिली.