पूर्व विदर्भात मधुमेहाचे ५३ हजार नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 10:43 AM2019-12-03T10:43:46+5:302019-12-03T10:44:57+5:30
फारसा गंभीरपणे न घेतला जाणारा मधुमेह हळूवारपणे पसरत आहे. या आजाराचे ५३ हजार रुग्ण नव्याने पूर्व विदर्भात आढळले आहेत.
गोपालकृष्ण मांडवकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फारसा गंभीरपणे न घेतला जाणारा मधुमेह हळूवारपणे पसरत आहे. या आजाराचे ५३ हजार रुग्ण नव्याने पूर्व विदर्भात आढळले आहेत. यामुळे एरवी साधा समजला जाणारा हा आजार गंभीरपणे घ्यावा लागणार आहे.
मधुमेह या आजाराची व्यापकता लक्षात घेऊन जागतिक स्तरावरून या आजाराला पायबंद घालण्यासाठी प्रयत्न होत आहेत. मधुमेह या आजारासह अन्य असंसर्गजन्य आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांच्या नोंदीसाठी झालेल्या सर्र्वेेक्षणमध्ये पूर्व विदर्भातील २८ लाख २० हजार ६८२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. असंसर्गजन्य आजार नियंत्रण तपासणी मोहिमेमध्ये राज्य शासनाच्या या उपक्रमामध्ये मधुमेहाने ग्रस्त असलेले ५२ हजार ७८० नवीन रुग्ण आढळले. १३ ते २८ सप्टेंबर या काळात ही तपासणी करण्यात आली होती. यात पूर्व विदर्भात सर्वाधिक २७ हजार २२६ रुग्ण फक्त वर्धा जिल्ह्यात आढळून आले आहेत. नागपूर जिल्ह्यात ४ हजार ८४०, चंद्रपूर जिल्ह्यात २ हजार ९३, गोंदिया जिल्ह्यात ८ हजार ४८०, भंडारा जिल्ह्यात ५ हजार ११३ तर गडचिरोली जिल्ह्यात ५ हजार ३७० रुग्णा आढळून आले आहेत.
आजाराने आर्थिक शोषण
मोठ्या प्रमाणावर पसरत असलेल्या या आजारामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण सुरू आहे. आजार एकदा चिकटला की त्याची तीव्रता शरीरात वाढू नये यासाठी रुग्णांकडून स्वत:वर औषधांचा आणि इंजेक्शनचा भडीमार केला जातो. यातून रुग्णांवर येणारे मानसिक दडपण व त्यापोटी निर्माण होणारे अन्य आजारही वेगळेच असतात. आजारांचे प्रमाण मोठे असल्याने त्यावरील औषधांची विक्रीही अधिक आहे. यातून रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण होत आहे.
तणावमुक्त जीवन हाच उपाय
या आजारापासून दूर राहण्यासाठी तणावमुक्त जीवन हाच उपाय सांगितला जात आहे. अलीकडे वाढलेले धकाधकीचे जीवन, रात्रपाळीत चालणारे काम, कामावरील जागरण, कामातून निर्माण होणारा मानसिक ताण, आहाराच्या न पाळल्या जाणाऱ्या वेळा ही यामागील प्रमुख कारणे सांगितली जातात. यासोबतच मधुमेह हा आजार अनुवांशिकपणेही आढळून येतो. त्यावर उपाय म्हणून तणावमुक्त जीवन, वक्तशीर जीवनशैली आणि व्यायाम हा उपाय तज्ज्ञांकडून सांगितला जातो.