अतिक्रमणधारकांकडून १७ दिवसांत ५.३३ लाख रुपये दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:12 AM2021-02-18T04:12:23+5:302021-02-18T04:12:23+5:30
- गेल्या दहा वर्षांत ठरली सर्वाधिक वसुली - लोकमत एक्सक्लुझिव्ह सैयद मोबीन / लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरात ...
- गेल्या दहा वर्षांत ठरली सर्वाधिक वसुली
- लोकमत एक्सक्लुझिव्ह
सैयद मोबीन / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात गेल्या महिनाभरापासून अतिक्रमणधारकांवर मनपाचा बुलडोझर चालत असून, त्यांना सळो की पळो करून सोडले आहे. मनपाच्या प्रवर्तन विभागासोबतच झोन स्तरावरील चमू अतिक्रमणविरोधी कारवाईत करीत आहे. यादरम्यान १७ दिवसांत मनपाच्या प्रवर्तन विभागाने अतिक्रमणधारकांकडून ५ लाख ३२ हजार ९०० रुपये दंड वसूल केला आहे. यात जीर्ण इमारतींना तोडण्यासाठी लागणारा चार्जही समाविष्ट आहे.
मनपा प्रवर्तन विभागाची चमू अतिक्रमण तोडण्यास जाते तेव्हा अतिक्रमणधारकांकडून ऑन दी स्पाॅट दंड वसूल केला जातो. याशिवाय अतिक्रमणधारकांनी मुदत मागितल्यास, त्यासाठीही दंड आकारण्यात येतो. कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेले साहित्य परत घेण्यासाठीही संबंधिताला दंड भरावा लागतो. यात किमान ५०० रुपये ते साहित्याच्या एकूण किमतीच्या २५ टक्के दंडाचा समावेश असतो. अशा तऱ्हेने मनपाच्या अतिक्रमणविरोधी विभागाने महिन्याभरात ५ लाख ३२ हजार ९०० रुपये दंड वसूल केला आहे.
अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान १९ जानेवारीला ७ हजार ५०० रुपये, २० जानेवारीला १५ हजार, २१ जानेवारीला २५ हजार, २२ जानेवारीला ९ हजार ५००, २५ जानेवारीला २९ हजार ५००, २७ जानेवारीला ३२ हजार ५००, २९ जानेवारीला २३ हजार ५००, १ फेब्रुवारीला १७ हजार, २ फेब्रुवारीला ३८ हजार ५००, ३ फेब्रुवारीला ७३ हजार ४००, ४ फेब्रुवारीला ५७ हजार ७००, ५ फेब्रुवारीला ५७ हजार ७००, ८ फेब्रुवारीला ४५ हजार २००, ९ फेब्रुवारीला ४१ हजार ५००, १० फेब्रुवारीला १७ हजार ७००, ११ फेब्रुवारीला ११ हजार ७०० व १२ फेब्रुवारीला ३० हजार रुपयांसह एकूण ५ लाख ३२ हजार ९०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
आयुक्तांच्या निर्देशानंतर कारवाई वेगाने
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी १६ जानेवारीला प्रवर्तन विभागाचे उपायुक्त महेश मोरोणे व सर्व झोनच्या सहायक आयुक्तांना झोन स्तरावर अतिक्रमणविरोधी अभियान चालविण्याचे निर्देश दिले होते. तेव्हापासून शहरात अतिक्रमणविरोधातील कारवाईने गती पकडली आहे. दिवसाच नव्हे, तर रात्रीसुद्धा फुटपाथवरून अतिक्रमणांचा सफाया करण्याची मोहीम राबविली जात आहे. यामुळे नागरिकांना अतिक्रमणमुक्त फुटपाथ उपलब्ध होत आहेत.
दहा वर्षांत एका महिन्यातील सर्वाधिक दंड
शहरातील विविध झोनमध्ये अतिक्रमणधारकांकडून गेल्या महिन्याभरात ५ लाख ३२ हजार ९०० रुपये दंड वसूल झाला आहे. गेल्या दहा वर्षांत एका महिन्यातील ही सर्वाधिक वसुली ठरली आहे. रस्त्यांच्या कडेला ठेल्यांवर खाद्यपदार्थांची विक्री करण्यासोबतच अन्न व औषधी प्रशासन विभागानेही संयुक्त कारवाई करण्यासाठी सहायक आयुक्तांना पत्र लिहिण्यात आले आहे.
- महेश मोरोणे, उपायुक्त, प्रवर्तन विभाग, मनपा