बियाण्यांसाठी ५३९ शेतकऱ्यांना लागली ‘लॉटरी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:07 AM2021-06-03T04:07:59+5:302021-06-03T04:07:59+5:30
उमरेड : महाडीबीटी पोर्टलवर अनुदानित बियाण्यांसाठी उमरेड तालुक्यातील ५३९ शेतकऱ्यांना लॉटरी लागली. बियाण्यांच्या लाभासाठी लॉटरी लागली असली तरी अद्याप ...
उमरेड : महाडीबीटी पोर्टलवर अनुदानित बियाण्यांसाठी उमरेड तालुक्यातील ५३९ शेतकऱ्यांना लॉटरी लागली. बियाण्यांच्या लाभासाठी लॉटरी लागली असली तरी अद्याप वितरणाचे काम सुरू झाले नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या योजनेअंतर्गत महाबीज बियाणे शेतकऱ्यांना वितरित होणार आहे. यामध्ये ९५६० या सोयाबीन वाणाचा अंतर्भाव असून, महाबीज महामंडळाच्या नियोजनाचा गोंधळ उडाल्याने पुरवठा आणि वितरण प्रणाली कचाट्यात सापडली आहे. उमरेड तालुक्यात ५३९ शेतकऱ्यांना ४४७ क्विंटल बियाणे मंजूर करण्यात आले आहे. या लाभाच्या बियाण्यांसाठी उमरेड खरेदी विक्री संस्था, मुंडले कृषी सेवा केंद्र, लेंडे कृषी केंद्र (आपतूर), नेने बंधू आणि श्री गणेश कृषी सेवा केंद्र या एकूण पाच केंद्रांची निवड तालुक्यात करण्यात आली आहे. शासनाने फारच उशिराने महाडीबीटी अंतर्गत अनुदानित बियाण्यांची योजना जाहीर केली. आधार सोबत मोबाईल लिंकबाबतच्या समस्येमुळे अनेकांची निराशा झाली. अशातही या योजनेत काही शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले. आता लॉटरी लागल्यानंतर शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मॅसेज धडकले आहेत. आता तालुका कृषी कार्यालयात दस्तऐवज सोबत नेत पुढील प्रक्रिया शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. त्यानंतर या कार्यालयातून परमिट मिळेल. या योजनेत २,३४० रुपयांच्या बॅगवर प्रतिकिलोमागे १२ रुपयांचे अनुदान मिळणार आहे. अनुुदानानंतर १,९८० रुपयाला एक बॅग शेतकऱ्यास पडणार आहे. पुरवठा आणि वितरण याबाबतच्या माहितीसाठी महाबीजच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. पावसाळा तोंडावर आहे. पूर्वमशागतीची कामेही संपण्याच्या मार्गावर आहे. अशावेळी पाऊस धडकताच पेरणीची कामे सुरू होतील. कामाच्या वेळेस आम्हाला धावपळ करावी लागेल. तेव्हा तातडीने महाडीबीटी योजनेची बियाणे शेतकऱ्यांना वितरित करा, अशी मागणी जोर धरत आहे.
मागणी अधिक, पुरवठा कमी
कृषी केंद्र संचालकांनी महाबीज सोयाबीनच्या बियाण्यांची मागणी आधीच नोंदविली होती. नोंदविलेल्या मागणीपैकी केवळ ३० ते ३५ टक्क्केच बियाण्यांचा महाबीजने पुरवठा केला. त्यातही बियाणे कृषी केंद्रात पोहोचल्यानंतर या बियाण्यांमधूनच महाडीबीटी योजनेचे अनुदानरूपी सोयाबीन द्यावयाचे आहे, असे पत्र कृषी संचालकांकडे धडकले. महाबीजने ज्यावेळी बियाण्यांचा पुरवठा केला, त्याचवेळी महाडीबीटी योजनेचे बियाणे यातूनच वितरित करावयाचे आहे, असे का सांगितले नाही, असा सवाल कृषी संचालकांचा आहे. आधी बियाणे पाठविले आणि नंतर सांगितले या गोंधळलेल्या नियोजनामुळे वितरणाची समस्या निर्माण होण्याची संभावना व्यक्त होत आहे.