भाजपातून ५४ बंडोबांची हकालपट्टी
By admin | Published: February 10, 2017 02:32 AM2017-02-10T02:32:16+5:302017-02-10T02:32:16+5:30
नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांत तिकीट न मिळाल्याच्या नाराजीतून भाजपाविरोधातच बंडखोरी करणे ५४ जणांना भोवले आहे.
सहा वर्षांच्या निलंबनाची कारवाई : संघ निष्ठावंतांचाही समावेश
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांत तिकीट न मिळाल्याच्या नाराजीतून भाजपाविरोधातच बंडखोरी करणे ५४ जणांना भोवले आहे. संघभूमीत इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली बंडखोरी पक्षाने गंभीरतेने घेतली असून, ५४ जणांना पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या निलंबितांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निष्ठा बाळगून असलेल्यांचा समावेश आहे.
शहरातील बऱ्याच प्रभागांमध्ये भाजपा तसेच संघ परिवारातील कार्यकर्त्यांना तिकिटांचे आश्वासन मिळाले होते. मात्र उमेदवारी न मिळाल्याने नाराजीतून अनेकांनी बंडखोरी करीत निवडणुकांचा अर्ज दाखल केला. कुणी शिवसेना, बसपा यासारख्या पक्षाची कास धरली तर अनेकांनी थेट अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करीत भाजपाला आव्हान दिले. शहरातील १० हून अधिक जागांवर तर संघ स्वयंसेवकच भाजप उमेदवारांविरोधातच उभे ठाकले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात पक्षातर्फे ‘डॅमेज कंट्रोल’ची मोहीम राबविण्यात आली. यामुळे अनेक बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. मात्र अनेकांनी निवडणूक लढविण्याचा निर्धार कायम ठेवला. पक्ष कार्यकारिणीने ही एकूण बाबच गंभीरतेने घेतली व ५४ पदाधिकारी-कार्यकर्त्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचा गुरुवारी निर्णय घेण्यात आला, अशी माहिती संघटनमंत्री भोजराज डुंबे यांनी दिली. या यादीत विद्यमान नगरसेवकांसोबतच शहर कार्यकारिणीतील सदस्यांचादेखील समावेश आहे हे विशेष.
पक्षशिस्त सर्वांना सारखी आहे. पक्षशिस्त मोडणाऱ्यांना पक्षात कुठलीही जागा नाही. तिकीट मिळाले नाही, म्हणून पक्षाविरोधात पाऊल उचलणे अयोग्यच आहे. त्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याचे, शहराध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
यांच्यावर झाली निलंबनाची कारवाई
अनिल धावडे, अनिता वानखेडे, डॉ. विशाखा जोशी, श्रीपाद रिसालदार, विशाखा मैंद, सुलोचना कोवे, रामदास गुडधे, रामकुमार गुप्ता, प्रज्ञा ढोरे, रवी मस्के, बाळा पुरोहित, वीणा कुकडे, चंदा धोटे, निहारिका भाम्बूळकर, मंजूषा भाम्बूळकर, आशिष मोहिते, लता मंडावी, संगीता बनाफर, जीवन रामटेके, शैलेश घोंगे, मालती मामीडवार, अनिता साखरकर, प्रसन्ना पातूरकर, पंकज पटेल, श्यामराव सोनकर, शिवपालसिंह, ज्ञानेश्वर साव, उषा अदगाळे, पिंकू वाडवे, नामदेव भोरकर, राजेंद्र धकाते, भास्कर पराते, विशाल लारोकर, गिरधारी निमजे, सुनील श्रीवास, वैशाली उदापूरकर, किरण फटिंग, शिरीष पुरोहित, विलास पराते, सुधीर जांभूळकर, खेमराज दमाहे, वनिता दमाहे, ज्योती जनबंधू, नितीन नागदेवते, मूलचंद शंभरगडे, उमेश मेंढे, दुर्गा पाटील, कमलेश धारणे, देवराव देवधरे, सुरेखा जांगीरवार, शोभा पटेल, जयश्री ढाले, प्रवीण पाटील, अशोक शेरिकुंजाम.