‘पीएफ’चे ५४ कोटी नागपूर महापालिकेकडे थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 10:26 AM2019-11-27T10:26:46+5:302019-11-27T10:29:40+5:30
महापालिकेतील कर्मचारी व शिक्षकांच्या वेतनातून दरमहा भविष्य निधीची कपात करण्यात येते. मागील तीन वर्षात कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेली ५४ कोटींची रक्कम भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात वळती करण्यात आलेली नाही.
गणेश हूड।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेतील कर्मचारी व शिक्षकांच्या वेतनातून दरमहा भविष्य निधीची कपात करण्यात येते. मागील तीन वर्षात कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेली ५४ कोटींची रक्कम भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात वळती करण्यात आलेली नाही. वेळोवेळी मागणी करूनही ही रक्कम जमा होत नसल्याने कर्मचारी व शिक्षकात अस्वस्थता पसरली आहे.
२०१७ सालापासून कर्मचारी व शिक्षकांना त्यांच्या खात्यात भविष्य निधीची रक्कम वळती केल्याच्या पावत्या मिळालेल्या नाही. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दर महिन्याला कपात करण्यात आलेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम भविष्य निर्वाह निधी विभागाकडे वळती करणे बंधनकारक आहे. मात्र मागील काही वर्षापासून महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेली रक्कम दुसऱ्या कामावर खर्च करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
कर्मचाऱ्यांना पावत्या मिळत नसल्याने आपल्या खात्यात भविष्य निर्वाह निधीची किती रक्कम जमा झाली याची माहिती त्यांना मिळत नाही. अडचणीच्या प्रसंगी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून रक्कम काढतात. परंतु त्यांच्याकडे पावत्या नसल्याने व किती रक्कम जमा झाली याची माहिती नसल्याने कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.
भविष्य निर्वाह निधीच्या रकमेवर बँकेच्या तुलनेत अधिक व्याज मिळते. परंतु वेळेवर रक्कमच भरली जात नसल्याने व्याजाची रक्कम कोण देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. वेतनातून कपात करण्यात आलेल्या या रक मेचा हिशेब ठेवण्याची जबाबदारी महापालिकेच्या लेखा व वित्त विभागाची आहे. परंतु २०१७ पासून कर्मचाºयांना पावत्या मिळालेल्या नाहीत. कर्मचारी व शिक्षक संघटनांनी वेळोवेळी पावत्यांची मागणी करून दर महिन्याला कपात होणारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरण्याची मागणी केली. परंतु याची दखलच घेतली जात नसल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
टप्प्याटप्प्याने रक्कम भरणार
कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम नेमकी किती आहे याची माहिती देता येणार नाही. परंतु ही रक्कम टप्प्याटप्प्याने भरण्याचे नियोजन सुरू आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती व गेल्या काही वर्षात वित्त विभागाचा कारभार प्रभारीवर असल्याने याकडे दुर्लक्ष झाले असावे. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्माण निधी व अंशदायी पेन्शन योजनेची रक्कम किती आहे. याची माहिती घेऊन ती भरण्याचे नियोजन केले जात आहे.
- अनंता मडावी, प्रमुख लेखा व
वित्त अधिकारी महापालिका
कर्मचारी व शिक्षकांना वेठीस धरण्याचा प्रकार
वेतनातून कपात के लेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम २०१७ पासून महापालिके ने वळती केलेली नाही. तीन वर्षापासून पावत्या मिळालेल्या नाही. गटविमा योजनेचेही ६ ते ७ कोटी भरलेले नाही. कर्मचाऱ्यांच्या हक्काचा हा पैसा आहे. न भरलेल्या रकमेवर व्याज कोण देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे.
- राजेश गवरे, अध्यक्ष
ना.म.न.पा.शिक्षक संघ
अंशदायी पेन्शन योजनेचे ३० कोटी भरलेच नाही
२००५ सालानंतर नोकरीत लागलेल्या कर्मचारी व शिक्षकांना पेन्शन मिळत नाही. त्यांच्यासाठी राज्य शासनाने अंशदायी पेन्शन योजना सुरू केली आहे. महापालिकेतील कर्मचाऱ्यांना २०१० पासून ही योजना लागू करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून मूळ वेतनाच्या १० टक्के रक्कम कपात करून व तितकाच वाटा महापालिकेला या योजनेत जमा करावयाचा आहे. परंतु आजवर ही रक्कम अंशदायी पेन्शन योजनेत जमा केलेली नाही. ही थकीत रक्कम ३० कोटीहून अधिक आहे.