५४ लाख ग्र्राहकांनी भरले ५२४ कोटी रुपयांचे बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 10:33 PM2020-09-15T22:33:19+5:302020-09-15T22:35:07+5:30
कोरोनाचे संक्रमण वाढत असताना सरकारने टप्प्याटप्प्याने अनलॉक केले आहे. त्याचा परिणामच म्हणावा लागेल की ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात वीज बिल भरले आहे. ऑगस्ट महिन्यात विदर्भातील किमान ५४ लाख ग्राहकांनी ५२४ कोटी रुपयांचे वीज बिल भरले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचे संक्रमण वाढत असताना सरकारने टप्प्याटप्प्याने अनलॉक केले आहे. त्याचा परिणामच म्हणावा लागेल की ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात वीज बिल भरले आहे. ऑगस्ट महिन्यात विदर्भातील किमान ५४ लाख ग्राहकांनी ५२४ कोटी रुपयांचे वीज बिल भरले आहे. महावितरणने ग्राहकांना ऑनलाईन वीज बिल भरण्यास आवाहन केले होते. या आवाहनालाही ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. मार्च महिन्यात लाकडाऊन लागल्यानंतर वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली होती. महावितरणच्या नागपूर प्रादेशिक विभागात ज्याचे कार्यक्षेत्र विदर्भ आहे, त्यात एप्रिल महिन्यात ३७ टक्के ग्राहकांनी बिल भरले होते. मे महिन्यात ३१ टक्के तर जून महिन्यात २५ टक्के ग्राहकांनी वीज बिल भरले होते. तीन महिन्याचे थकित बील एकत्र आल्याने ग्राहकांमध्ये रोष होता. उर्जा मंत्र्यांच्या निर्देशानुसार महावितरणने ग्राहकांना तीन हप्ते पाडून दिले होते. लॉकडाऊन मध्ये बिल भरणाऱ्या ग्राहकांना २ टक्के सुट देण्यात आली. ग्राहकांशी विविध माध्यमातून संपर्क करून त्यांना बिल भरण्यास प्रेरित करण्यात आले. त्यामुळे वीज बिल भरणाऱ्यांची संख्या वाढली. सर्वाधिक ग्राहक नागपुरातील विदर्भात वीज बिल भरणारे सर्वाधिक ग्राहक नागपुरातील आहेत, तर सर्वात कमी ग्राहक अकोला येथील आहे. ऑगस्ट महिन्यात नागपूर परिमंडळांतर्गत १६ लाख ग्राहकांनी २४३ कोटी रुपये वीज बिलाचे भरले. चंद्रपुरात ७ लाख ग्राहकांनी ७५ कोटी रुपये वीज बिल भरले. गोंदियात ५ लाख ग्राहकांनी ५३ कोटी, अमरावती १२ लाख ग्राहकांनी ८६ कोटी व अकोल्यात ११ लाख ग्राहकांनी ६७ कोटी रुपयांचे वीज बिल भरले.