५४,१८६ मालमत्ताधारक ५ टक्के सवलतीचे लाभार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:12 AM2021-08-24T04:12:11+5:302021-08-24T04:12:11+5:30
६३ लाखाची सूट : ३१ डिसेंबरपर्यंत सवलत लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागरिकांना दिलासा देण्यासाठी नागपूर महापालिकेने १ जुलै ...
६३ लाखाची सूट : ३१ डिसेंबरपर्यंत सवलत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागरिकांना दिलासा देण्यासाठी नागपूर महापालिकेने १ जुलै ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत कर भरणाऱ्यांना ५ टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. १९ ऑगस्टपर्यंत ५४,१८६ मालमत्ताधारकांनी याचा लाभ घेतला आहे.
कोविड कालावधीत नागरिक आर्थिक अडचणीत सापडले. त्यांना दिलासा देण्यासाठी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ही सवलत लागू केल्यापासून मनपा तिजोरीत १५.२३ कोटींचा महसूल जमा झाला, तर ६३ लाखाची सूट देण्यात आली.
नागपूर शहरात सुमारे ६.५० लाख मालमत्ताधारक आहेत. ऑगस्टपूर्वी चार लाखाहून अधिक डिमांड वाटप मालमत्ता कर विभागाने केले. उर्वरित डिमांड वाटपाचे उद्दिष्ट लवरच पूर्ण केले जाणार आहे. १ एप्रिल ते १९ ऑगस्टदरम्यान मालमत्ता करातून ७५ कोटी जमा झाले. गेल्या वर्षी या कालावधीत ५६ कोटी जमा झाले होते. याचा विचार करता, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १९ कोटींचा कर अधिक जमा झाला आहे.
वित्त वर्षात मालमत्ता करातून २९० कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट आहे. वास्तविक जुनी थकबाकी गृहित धरता ९०० कोटीहून अधिक थकबाकी आहे.
३० जूनपर्यंत मालमत्ता कर भरणाऱ्यांना १० टक्के सूट देण्यात आली. याचा ५१ हजार मालमत्ताधारकांनी लाभ घेतला. प्रथमच सरकारी कर वगळता अन्य करावर थेट सूट देण्यात आली.
...........
...तर कारवाईला तयार राहा
नागरिकांना दिलासा देण्यासाठी आयुक्तांनी कर सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. मालमत्ताधारकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, ३१ डिसेंबरपर्यंत ही योजना राहणार आहे. निर्धारित कालावधीत कर जमा न केल्यास संबंधित मालमत्ताधारकांवर कारवाई केली जाईल, असा इशारा उपायुक्त (महसूल) मिलिंद मेश्राम यांनी दिला आहे.