राज्यात महावितरणच्या हलगर्जीमुळे विजेच्या शॉकने ५४७ बळी; माहिती अधिकारातून बाब उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2022 11:05 AM2022-02-05T11:05:17+5:302022-02-05T11:15:40+5:30

एप्रिल २०१९ पासून ३२ महिन्यांत राज्यभरात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे वीजेचा शॉक लागून ५४७ नागरिकांना जीव गमवावा लागला.

547 killed due to electric shock due to negligence of MSEDCL | राज्यात महावितरणच्या हलगर्जीमुळे विजेच्या शॉकने ५४७ बळी; माहिती अधिकारातून बाब उघड

राज्यात महावितरणच्या हलगर्जीमुळे विजेच्या शॉकने ५४७ बळी; माहिती अधिकारातून बाब उघड

googlenewsNext
ठळक मुद्दे३२ महिन्यांची राज्यातील आकडेवारी आर्थिक मदतीत हात आखडता, ४१ टक्क्यांच्या वारसांनाच साहाय्य

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महावितरणच्या भोंगळ कारभाराचे अनेक नमुने समोर येत असतात, मात्र विभागाच्या हलगर्जीपणाने शेकडो लोकांच्या प्राणावरच घाव घातला. एप्रिल २०१९ पासून ३२ महिन्यांत राज्यभरात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे वीजेचा शॉक लागून ५४७ नागरिकांना जीव गमवावा लागला. या मृतांच्या वारसांना मदत देण्यातदेखील महावितरणने हात आखडते घेतल्याचे दिसून येत आहे. माहिती अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत महावितरणकडे विचारणा केली होती. एप्रिल २०१९ ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीत राज्यात विजेच्या शॉकने किती अपघात झाले व त्यात किती जणांचे बळी गेले, किती प्रकरणांत महावितरण जबाबदार होते व किती जणांना आर्थिक सहकार्य मिळाले याबाबत त्यांनी विचारणा केली होती.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, एप्रिल २०१९ ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीत राज्यभरात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ५४७ नागरिक व १ हजार ९११ प्राण्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. यातील २२९ मृत व्यक्तींच्या वारसांना ८ कोटी ९८ लाखांची मदत देण्यात आली. उर्वरितांना अद्यापही मदत मिळालेली नाही.

दुसरीकडे मृत्यू झालेल्या जनावरांपैकी ६८२ जनावरांच्या मालकांनाच (३५.६९ टक्के) आर्थिक साहाय्य मिळाले. त्यांना मिळालेल्या मदतीची रक्कम २ कोटी २३ लाख इतकी होती.

राज्यातील ३२ टक्के मृत्यू विदर्भातील

दरम्यान, ३२ महिन्यांच्या कालावधीत विजेच्या शॉकमुळे २ हजार ६५७ प्राणांतिक अपघात झाले. त्यापैकी ८५८ मृत्यू (३२.२९ टक्के) हे विदर्भातील होते. राज्यभरात ३ हजार १२० प्राण्यांचे प्राणांतिक अपघात झाले व त्यात विदर्भातील १ हजार १८३ प्राण्यांचा मृत्यू झाला.

राज्यातील आकडेवारी

वर्ष : राज्यातील प्राणांतिक अपघात : विदर्भातील मृत्यू

२०१९-२० : १,०१२ : ३२३

२०२०-२१ : १,०६० : ३५६

२०२१- २२ (नोव्हेंबरपर्यंत) : ५८५ : १७०

Web Title: 547 killed due to electric shock due to negligence of MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.