नागपुरातील ५५ टक्के सीसीटीव्ही बंद, १५ दिवसांत सुरू करा; चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

By योगेश पांडे | Updated: February 5, 2025 22:12 IST2025-02-05T22:12:01+5:302025-02-05T22:12:16+5:30

१० कोटींचा निधीदेखील उपलब्ध करून देण्यात येणार

55 percent of CCTVs in Nagpur are closed start them in 15 days Chandrashekhar Bawankule instructions | नागपुरातील ५५ टक्के सीसीटीव्ही बंद, १५ दिवसांत सुरू करा; चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

नागपुरातील ५५ टक्के सीसीटीव्ही बंद, १५ दिवसांत सुरू करा; चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

नागपूर : उपराजधानीतील अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात सीसीटीव्हींचा मौलिक वाटा राहिला आहे. मात्र मागील काही दिवसांपासून ५५ टक्के सीसीटीव्ही कॅमेरे विविध कारणांनी बंद आहेत. हे सीसीटीव्ही कॅमेरे १५ दिवसांत सुरु करावेत असे निर्देश राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. यासाठी १० कोटींचा निधीदेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नागपूर शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आढावा घेण्यासाठी बावनकुळे यांनी मंत्रालयात बैठक बोलविली होती. या बैठकीला माहिती तंत्रज्ञान विभागाचे मंत्री आशीष शेलार, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तथा नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल आदी उपस्थित होते. तर पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल हे ऑनलाईन उपस्थित होते.

नागपूर शहरात एल अँड टी कंपनीकडून सुमारे ३६०० कॅमेरे बसविण्यात आले होते. त्यातील २००० कॅमेरे हे बंद आहेत. यापैकी ११०० कॅमेरे हे विविध प्रकारची कामे सुरू असल्याने बंदस्थितीत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. नागपूर शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्ह्याचा शोध घेणे सोपे होईल. चोरी, खून, दरोडा तसेच अपघातातील गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी हे कॅमेरे उपयोगी ठरणार असून, त्यामुळे बंद असलेले कॅमेरे १५ दिवसांत दुरुस्त करून ते कार्यान्वित करावेत, असे निर्देश बावनकुळे यांनी दिले. तसेच कंपनीने दुरुस्त करून सुरू केलेले कॅमेरे चांगल्या पद्धतीने काम करत आहेत की नाही हे पाहण्यासाठी पोलिस आयुक्तालयातील माहिती आणि तंत्रज्ञान या विषयाचे विशेष ज्ञान असणाऱ्या पथकाने याची पाहणी करावी, असेही आदेश बावनकुळे यांनी पोलीस आयुक्तांना दिले.

Web Title: 55 percent of CCTVs in Nagpur are closed start them in 15 days Chandrashekhar Bawankule instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.