कोरोना रुग्णामुळे तब्बल २८ दिवसापासून ५५ दुकाने बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 08:46 PM2020-07-16T20:46:44+5:302020-07-16T20:47:54+5:30
गणेशपेठ बसस्टॅण्डसमोरील एका निवासी संकुलात कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर मनपाने संकुलासमोरील ५५ दुकानांचा परिसर सील केला आहे. रुग्ण सात दिवसातच बरा होऊन शहरात फिरत आहे, पण दुकाने अजूनही सील असल्याने सर्वांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. दुकाने सुरू करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी मनपाकडे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गणेशपेठ बसस्टॅण्डसमोरील एका निवासी संकुलात कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर मनपाने संकुलासमोरील ५५ दुकानांचा परिसर सील केला आहे. रुग्ण सात दिवसातच बरा होऊन शहरात फिरत आहे, पण दुकाने अजूनही सील असल्याने सर्वांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. दुकाने सुरू करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी मनपाकडे केली आहे.
निवासी संकुलात एका फ्लॅटमध्ये १८ जूनला एक कोरोना रुग्ण आढळून आला. या रुग्णाला मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. रुग्णावर उपचार करून सात दिवसात सुटी देण्यात आली. तो रूग्ण कामानिमित्त आता शहरात फिरत आहे. पण त्याची शिक्षा दुकानदारांना २८ दिवसांपासून भोगावी लागत आहे. रुग्ण आढल्यानंतर मनपाच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्याच दिवशी रस्त्यावरील व्यावसायिक संकुलातील दोन इमारतीचे प्रवेशद्वार कठडे लावून बंद केले. व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास मनाई करण्यात आली. १९ जूनपासून १६ जुलैपर्यंत दुकाने उघडली नाहीत. या दरम्यान व्यापाऱ्यांनी धंतोली झोनच्या सहायक आयुक्त बागडे यांना निवेदन दिले. त्यांनी सात दिवसात दुकाने सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर १४ दिवसानंतर सुरू करू, असे सांगितले. पण आता २८ दिवस झाल्यानंतरही दुकाने सुरू झाली नाहीत.
कोरोना रुग्णाची शिक्षा आम्हाला का?
कोरोना रुग्ण बरा होऊन शहरात फिरत आहे, पण आमची दुकाने बंद आहेत. या रुग्णााची शिक्षा आम्हाला का? असा सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर एका दुकानदाराने सांगितले की, राज्य शासनाच्या १९ मार्चच्या लॉकडाऊननंतर दुकाने तब्बल अडीच महिने बंद होती. ४ जून महिन्यात दुकाने सुरू झाली, पण १९ जूनपासून मनपाने पुन्हा दुकाने बंद केली. या संकुलात ट्रॅव्हलची कार्यालये, प्रिटिंग प्रेस, हॉटेल, स्टेशनरी आणि अनेक आवश्यक वस्तूंची दुकाने आहेत. सर्वांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. दुकान खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाचे व्याज भरावे लागत आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना रुग्णाचे निवास आणि दुकानांमध्ये जवळपास ६० ते ७० मीटरचे अंतर आहे. अशावेळी मनपाने दुकाने उघडण्यास हवी होती. सहायक आयुक्त बागडे फाईल मनपाच्या मुख्य कार्यालयात पाठविल्याचे सांगत आहेत. पण त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही. दुकाने सुरू होण्याची व्यापारी वाट पाहात आहेत.
२८ दिवसानंतर परिसर खुला करू
कोरोना रुग्ण आढळल्यानंतर परिसर २८ दिवसांसाठी सील करण्यात येतो. परिसर आणि घटनेची माहिती सहायक आयुक्तांकडून घेऊ. फाईल बघितल्यानंतर परिसर खुला करण्यावर निर्णय घेण्यात येईल.
राम जोशी, अतिरिक्त आयुक्त, मनपा.