कोविड-१९ लॉकडाऊनमुळे उपराजधानीतील औद्योगिक क्षेत्रात ५७ हजार बेरोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 08:14 PM2020-04-10T20:14:20+5:302020-04-10T20:17:40+5:30
कोविड-१९ या महामारीने लॉकडाऊन झाल्यानंतर नागपूर शहर आणि त्याच्या आसपासच्या चार मोठ्या औद्योगिक वसाहतींमध्ये जवळजवळ ५७ हजार लोक बेरोजगार झाल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड-१९ या महामारीने लॉकडाऊन झाल्यानंतर नागपूर शहर आणि त्याच्या आसपासच्या चार मोठ्या औद्योगिक वसाहतींमध्ये जवळजवळ ५७ हजार लोक बेरोजगार झाल्याची माहिती आहे.
सुरुवातीला, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी १९ मार्च रोजी राज्यात लॉकडाऊन जाहीर केले आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मार्च रोजी २१ दिवसाच्या लॉकडाऊनची घोषणा केली. २१ दिवसाच्या टाळेबंदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या टाळेबंदीमुळे झालेल्या नुकसानीचे आकलन करण्यासाठी लोकमतने हिंगणा, बुटीबोरी आणि कळमेश्वर औद्योगिक वसाहतीतील उद्योग संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. मिहान-सेझच्या बाबतीत प्रयत्न निष्फळ ठरले आणि एकूण औद्योगिक क्षेत्राचा अंदाज तेथील युनिटधारकांच्या अंदाजानुसार आहे.
एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष (एमआयए) चंद्रशेखर शेगावकर म्हणाले, टाळेबंदी होण्यापूर्वी हिंगणा औद्योगिक क्षेत्रात १०५० युनिट कार्यरत होते आणि दररोजचे उत्पादन १८ ते २० कोटी रुपये होते. सध्या केवळ ३५ युनिट कार्यरत आहेत आणि एक ते दीड कोटी रुपयांच्या वस्तूंचे उत्पादन करतात. लॉकडाऊन होण्यापूर्वी हिंगणा एमआयडीसी क्षेत्रात सुमारे ३० हजार नोकºया उपलब्ध होत्या, पण सध्या ते केवळ एक हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत.
बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (बीएमए) अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल म्हणाले, बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात ५५० युनिट आहेत. यापैकी केवळ २० ते २३ युनिट मुख्यत: अन्न प्रक्रिया, औषधनिर्माण व पॅकेजिंगमध्ये कार्यरत आहेत. लॉकडाऊन होण्यापूर्वी बुटीबोरी औद्योगिक क्षेत्र जवळपास २५ हजार लोकांना रोजगार उपलब्ध होते. आता या संख्येत घट होऊन आकडा १,१०० वर आला आहे. दैनंदिन उत्पादन ३० कोटी रुपयांवरून घसरून २ कोटींपर्यंत कमी झाले आहे.
कळमेश्वर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अमर मोहिते म्हणाले, औद्योगिक क्षेत्रात ८५ युनिट असून त्यातील सर्वात मोठे जिंदाल स्टील वर्क्स (जेएसडब्ल्यू) हे रंगीत स्टील शीटचे युनिट आहे. जेएसडब्ल्यू युनिटमध्ये जवळपास एक हजार कर्मचारी कार्यरत आहेत, पण हे युनिट सध्या बंद आहे. कळमेश्वरमध्ये फार्मास्युटिकल क्षेत्रात फक्त पाच लहान युनिट कार्यरत आहेत. एकूण रोजगार २६०० वरून ५०० पर्यंत खाली आला आहे आणि उत्पादन ५ कोटींवरून घसरून २० ते ३० लाखांपर्यंत आले आहे.
मिहान-सेझ भागातील युनिटची माहिती देण्यासाठी एमएडीसीचा कोणताही अधिकारी उपलब्ध नसला तरी तेथील कार्यरत सूत्रांनी सांगितले की, औद्योगिक क्षेत्रात ७० युनिट आहेत आणि त्यातील २० माहिती तंत्रज्ञान (आयटी) युनिट आहेत. या युनिटमध्ये जवळपास ४,५०० लोक कार्यरत आहेत. बहुतेक आयटी घटकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे नोकरीची नेमकी हानी केवळ दोन हजाराच्या आसपास होऊ शकते.
कोविड-१९ लॉकडाऊनमुळे नागपुरातील उद्योगांवर झालेला परिणाम
औद्योगिक क्षेत्र युनिटची संख्या कामगार/कर्मचारी परिचालन युनिट कामगार/कर्मचारी गमावलेल्या नोकºया
हिंगणा १,०५० ३०,००० ३५ १,००० २९,०००
बुटीबोरी ५५० २५,००० २३ १,१०० २३,९००
कळमेश्वर ८५ २,६०० ५ ५०० २,५००
मिहान-सेझ ७० ४,५०० १५ २,५०० २,०००
एकूण १,८०५ ६२,१०० ७८ ५,१०० ५७,४००
- दैनंदिन उत्पादन (अंदाजे) ५५ कोटी रुपये, सध्या उत्पादन ३.८० कोटी रुपये, दैनंदिन उत्पादन ठप्प (अंदाजे) ५१.२० कोटी रुपये.
- लॉकडाऊनमध्ये कार्यरत असलेल्या प्रमुख युनिटमध्ये मुख्यत्त्वे फार्मास्युटिकल आणि फूड युनिटचा समावेश आहे. बहुतांश युनिट बुटीबोरीमध्ये सुरू आहेत.
- हिंगणा आणि कळमेश्वरमध्ये सुरू असलेल्या युनिटमध्ये अल्कोहोल आधारित सॅनिटायझर्स, मास्क आणि औषधे तयार करीत आहेत.
- वर्कफोर्स डेटामध्ये हेडलोड कामगार, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, मेसन्स, ड्रायव्हर्स, सफाई कामगार दरदिवशी कार्यरत आहेत.