५.७५ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त; तिघांना अटक
By दयानंद पाईकराव | Published: June 24, 2023 04:44 PM2023-06-24T16:44:22+5:302023-06-24T16:44:49+5:30
युनिट तीनची कारवाई
नागपूर : पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या टेका नाका वस्तीमध्ये अवैधरित्या सुगंधित तंबाखूची विक्री करणाऱ्याच्या घरी धाड टाकून ५ लाख ७९ हजाराचा मुद्देमाल जप्त करून तीन आरोपींना अटक करण्यात आली. ही कारवाई गुरूवारी २२ जूनला सायंकाळच्या सुमारास करण्यात आली.
निजाम अहमद सुल्तान अहमद (वय ४०), रवी हिरालाल चव्हान (वय ३४), सोमेश्वर मुकेश हारके (वय ३४) सर्वजण रा. मुकुंद नगर, टेका नाका, पाचपावली अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील दोन आरोपी फरार आहेत. टेका नाका परिसरात अवैधरित्या सुगंधित तंबाखू विक्री करीत असल्याची माहिती युनिट तीनच्या पथकाला मिळाली. यावरुन अपर पोलीस आयुक्त संजय पाटील, पोलीस उपायुक्त (डिटेक्शन)मुम्मका सुदर्शन, सहायक पोलिस आयुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन बोंडे यांच्या नेतृत्त्वातील पथकाने धाड टाकली.
यावेळी आरोपींच्या ताब्यातून सुंगधीत पान मसाले आणि गुटखा आणि सुगंधित तबांखू, तसेच पॅकींग करीता लागणारे साहित्य व इतर वस्तू असा एकुण पाच लाख ७९ हजार ९०० रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान आरोपींनी हा मुद्देमाल कोमल नागानी उर्फे गोपाल (रा. राजनांदगाव, छतीसगड), नामदेव चांगलानी (रा. हिंगणघाट) यांच्याकडून माल घेवून पॅकींग करून विक्री करत असल्याचे सांगीतले. युनिट तीनच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेऊन पाचपावली पोलिसांच्या स्वाधीन केले.