‘शूज रॅक’मध्ये घराची चाबी ठेवणे पडले महागात, चोरट्यांनी घर केले साफ
By योगेश पांडे | Published: April 10, 2023 04:13 PM2023-04-10T16:13:57+5:302023-04-10T16:16:30+5:30
संबंधित चोरी ही ओळखीच्याच व्यक्तीने केल्याचा पोलिसांना संशय
नागपूर : ‘शूज रॅक’मध्ये घराची चाबी ठेवणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. अज्ञात चोरट्यांनी तेथील चाबी घेऊन घराचे कुलूप उघडत ५.७७ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
रेखा मोरेश्वर भेंडे (४५, चैतन्यननगर, पांडे किराणा दुकानाजवळ) या ९ एप्रिल रोजी घराला कुलूप लावून शेती पाहण्यासाठी टेमसना या गावी गेल्या होत्या. सर्वसाधारणत: त्या बाहेर जात असताना चप्पल जोडे ठेवण्याच्या रॅकमध्ये चाबी ठेवत होत्या. त्या दिवशीदेखील त्यांनी तेथेच चाबी ठेवली. त्या बाहेर गेल्यावर दुपारी एक वाजेनंतर अज्ञात चोरट्यांनी तेथून चाबी घेतली व घराचे कुलूप उघडत आत प्रवेश केला.
चोरट्यांनी बेडरूममधील लोखंडी कपाटातून सोन्याचे दागिने व रोख ४५ हजार रुपये असा एकूण ५.७७ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. घरी आल्यावर भेंडे यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाठोडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संबंधित चोरी ही ओळखीच्याच व्यक्तीने केल्याचा पोलिसांना संशय आहे.