८ महिन्यांत ५८ खून
By Admin | Published: October 4, 2016 06:11 AM2016-10-04T06:11:45+5:302016-10-04T06:11:45+5:30
गेल्या काही दिवसांत शहरात घडलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे ‘क्राईम ग्राफ’चा मुद्दा चर्चेत आला आहे. मागील
दरोडे, अपहरण, फसवणुकीच्या प्रमाणात वाढ : एकूण गुन्ह्यांचे प्रमाण चार टक्क्यांनी घटले
नागपूर : गेल्या काही दिवसांत शहरात घडलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे ‘क्राईम ग्राफ’चा मुद्दा चर्चेत आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी सुरुवातीच्या आठ महिन्यांत एकूण गुन्ह्यांचे प्रमाण चार टक्क्यांनी कमी झाले असले तरी सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत वाढली आहे. २०१६ मध्ये आॅगस्ट महिन्यापर्यंत शहरात ५८ खून झाले आहेत. मागील वर्षी हीच संख्या ४७ इतकी होती. याशिवाय दरोडे, अपहरण, फसवणुकीच्या प्रमाणातदेखील मागील वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. माहितीच्या अधिकाराअंतर्गत ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी २०१६ सालात शहरात घडलेल्या विविध गुन्ह्यांबाबत माहितीच्या अधिकाराअंतर्गत विचारणा केली होती. जानेवारी ते आॅगस्ट या कालावधीत शहरात किती गुन्ह्यांची नोंद झाली, त्यात हत्येचे किती गुन्हे होते, मागील वर्षी या महिन्यांतील आकडेवारी किती होती, याबाबत त्यांनी प्रश्न विचारले होते. नागपूर पोलिसांच्या गुन्हेशाखेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जानेवारी २०१६ ते आॅगस्ट २०१६ या कालावधीत शहरात विविध प्रकारचे ६ हजार ३७९ गुन्हे नोंदविण्यात आले.
यातील ४ हजार ४३ गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.
१७ दरोडे, ३२५ अपहरण
२०१६ मधील १ जानेवारी ते ३१ आॅगस्ट या कालावधीत शहरात १७ दरोडे टाकण्यात आले. तर ३२५ अपहरणाच्या प्रकरणांची नोंद झाली. मागील वर्षीच्या तुलनेत अपहणांचे प्रमाण ३४ टक्क्यांनी वाढले आहे. दरोड्यांच्या एकूण प्रकरणांपैकी १४ मध्ये पोलिसांना आरोपींचा छडा लावण्यात यश आले. तर अपहरणांच्या प्रकरणांत हाच आकडा २८४ इतका आहे. फसवणुकीच्या घटनांचे प्रमाणदेखील वाढीस लागले असून ८ महिन्यांत २६४ प्रकरणांची नोंद झाली.