नागपुरात एटीएम फोडून ५.८२ लाखांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2022 10:44 PM2022-07-30T22:44:13+5:302022-07-30T22:45:40+5:30
Nagpur News सीताबर्डी ठाण्यांतर्गत पंचशील चौकातील रामदासपेठच्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून अज्ञात आरोपींनी ५ लाख ८२ हजार ५०० रुपयांची चोरी केल्याची घटना घडली आहे.
नागपूर : सीताबर्डी ठाण्यांतर्गत पंचशील चौकातील रामदासपेठच्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून अज्ञात आरोपींनी ५ लाख ८२ हजार ५०० रुपयांची चोरी केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे बँक अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सीताबर्डीच्या अतिशय वर्दळीच्या या मार्गावर एटीएमजवळ एक सुरक्षा रक्षत तैनात राहतो, परंतु रात्रीच्या वेळी गार्ड राहत नाही. रात्री १ वाजल्यानंतर हा रस्ता शांत होतो. त्याचा फायदा घेऊन अज्ञात आरोपी एटीएममध्ये शिरले. त्यांनी मशीनचा नोटा टाकण्याचे दार उघडून आतून ५०० रुपयांच्या १,१६५ नोटा काढल्या.
शनिवारी सकाळी १० वाजता बँकेची शाखा उघडल्यानंतर मशिनचा दरवाजा उघडा असून, मशिनमध्ये पैसे नसल्याचे समजले. त्यानंतर, त्वरित पोलिसांना सूचना देण्यात आली. चोरीची माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक अतुल सबनिस आणि पोलीस फॉरेन्सिक टीमला घेऊन घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर, ही मशीन मोठ्या शिताफीने उघडण्यात आल्याची माहिती मिळाली. यामुळे आरोपींना मशिनची तांत्रिक माहिती असल्याची माहिती मिळाली. सीसीटीव्ही फुटेजच्या साह्याने पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
...........