५८२५ शेतकरी सावकारी कर्जातून मुक्त
By admin | Published: December 30, 2015 03:24 AM2015-12-30T03:24:54+5:302015-12-30T03:24:54+5:30
सावकारी कर्जमाफी योजनेंतर्गत आतापर्यंत आठ जिल्हास्तरीय बैठका घेण्यात आल्या असून आतापर्यंत ५८२५ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला आहे.
नागपूर : सावकारी कर्जमाफी योजनेंतर्गत आतापर्यंत आठ जिल्हास्तरीय बैठका घेण्यात आल्या असून आतापर्यंत ५८२५ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला आहे. या शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेल्या ९.९४ कोटी रुपयांची कर्ज मंजुरी घेतली आहे.
याचा जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आढावा घेतला. त्याअनुषंगाने कर्ज माफीची रक्कम ही संबंधित परवानाधारक सावकारांनी शेतकऱ्यांनी गहाण ठेवलेली तारण वस्तू परत करावी. त्यांच्या पोचपावतीसह माफीची रक्कम प्राप्त करुन घेण्याकरिता प्रस्ताव तालुका सहायक निबंधकाकडे विनाविलंब सादर करावेत, असे निर्देश सुद्धा जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिले.
परवानाधारक सावकार काही कर्जदारांचीच गहाण वस्तू परत करतात आणि काही लोकांचे गहाण बरेच दिवसापासून परत केलेले नाही. त्यामुळे माफीची रक्कम वितरित करण्यात अडचणी येत आहे. ज्या शेतकरी कर्जदाराला सावकारी कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे त्यांनी देखील स्वत:ची रुजवात तालुका सहायक निबंधकाकडे करून त्यांच्या गहाणवस्तू सावकराकडून स्वत:च्या ताब्यात घेऊन सदर योजनेचा लाभ घ्यावा. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना निरोप देऊनसुद्धा ते वेळीच गहाणवस्तू परत नेत नाहीत. त्यामुळे देखील सावकारांच्या खात्यात माफीची रक्कम जमा करण्यात विलंब होत आहे.
सर्व तालुका सहायक निबंधकांनी ज्या शेतकरी कर्जदाराला सावकारी कर्जमाफीची रक्कम मंजूर झाली आहे त्या सर्व शेतकरी कर्जदाराला लेखी पत्र द्यावे आणि गहाण वस्तू परत केल्याची पोच पावती व रुजवातीसह प्रस्ताव तालुका सहायक निबंधकांनी विनाविलंब जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नागपूरकडे सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)