५८५ किलो हर्टसवर.. हे आकाशवाणीचे नागपूर केंद्र आहे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 10:55 AM2021-07-16T10:55:19+5:302021-07-16T11:02:06+5:30
Nagpur News आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे पहिले प्रसारण १६ जुलै १९४८ रोजी झाले. तेव्हापासून ते एफएम, ऑनलाइन रेडिओ, आदींच्या आधुनिक काळापर्यंत सुरू असलेली आकाशवाणीची वाटचाल नेत्रदीपक आहे.
प्रवीण खापरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तंत्रज्ञान कितीही बदलो, मीडिया कधीच लोप पावत नाही... हे म्हणणे आहे, आकाशवाणीचे माजी कार्यक्रम अधिकारी प्रा. बबन नाखले यांचे. नागपूर आकाशवाणीचे अर्काईव्हज अर्थात जुन्या आठवणींचा खजिना पाहिला की त्यांच्या या कथनाला दुजोरा मिळतो. स्मृतींच्या संग्रहाचा एवढा साठा क्वचितच कुणाकडे, कोण्या संस्थेकडे असेल. त्यामुळे, हे नुसते शासकीय स्थळ ठरत नाही तर लाखो मनांच्या प्रतिबिंबाचा वारसा ठरते.
आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे पहिले प्रसारण १६ जुलै १९४८ रोजी झाले. तेव्हापासून ते एफएम, ऑनलाइन रेडिओ, आदींच्या आधुनिक काळापर्यंत सुरू असलेली आकाशवाणीची वाटचाल नेत्रदीपक आहे. ५८५ किलो हर्टझ तरंग वारंवारिता असलेल्या या केंद्रावरून युवावाणी, विविध भारती, वृत्त विभाग, कृषी आदी विविध विभागांचे प्रसारण होत असते. आजही या केंद्रांवरून होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा गोडवा रसिक मनांमध्ये कायम आहे. आजही खेडोपाडी आणि शहरांत आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू, आचार्य विनोबा भावे यांच्या निधनाचे थेट आवाजी प्रक्षेपण, लाइव्ह क्रिकेट समालोचन, अनेक घटनांचे वृत्तनिवेदन आणि त्यांचे कलेक्शन आजही आकाशवाणीकडे अर्काईव्हच्या स्वरूपात संग्रहित आहे.
कस्तूरचंद डागा यांनी दिली इमारत
इंग्रजांनी स्थापन केलेल्या भारतीय राज्य प्रसारण मंडळाचे १९३६ साली ऑल इंडिया रेडिओ असे नामकरण झाले. नागपुरात आकाशवाणी केंद्राची पायाभरणी आजच्या केंद्राच्याच ठिकाणी झाली. कस्तूरचंद डागा यांच्या मालकीच्या डागा इमारतीतच हे केंद्र सुरू झाले. ही इमारत आजही ऐतिहासिक वारसा म्हणून संरक्षित आहे.
दररोज किलोने यायची पत्रे
रेडिओ हे श्रवण माध्यम असल्याने कोण बोलतेय, हे कळत नव्हते. त्यामुळे, आवाजाचे प्रचंड फॅन फॉलोईंग असे. ‘माझं गाव माझं वावर’ या कार्यक्रमातील ‘खंडूजी’ हे पात्र इतके प्रसिद्ध होते की त्यांना भेटण्यासाठी प्रचंड गर्दी होत असे. दररोज किलो-दोन किलो पत्र येत असत आणि त्यांची उत्तरे देणे कठीण होत होते. मात्र, उत्तरे देणे क्रमप्राप्त असे.
- प्रा. बबन नाखले, निवृत्त कार्यक्रम अधिकारी, आकाशवाणी नागपूर केंद्र
.................