अखेर ५८ कोटींच्या फसवणूक प्रकरणातील आरोपी सोंटू जैनची शरणागती
By योगेश पांडे | Published: October 16, 2023 04:54 PM2023-10-16T16:54:17+5:302023-10-16T16:57:53+5:30
अनेक दिवसांपासून होता फरार : चौकशीतून अनेक तथ्य समोर येण्याची शक्यता
नागपूर : ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली नागपुरातील व्यापाऱ्याला ५८ कोटींचा गंडा घालणारा सोंटू जैन या आरोपीने अखेर सोमवारी प्रथम श्रेणी कनिष्ठ न्यायालयासमोर शरणागती पत्करली. सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन नाकारल्यानंतर त्याच्यासमोर हाच पर्याय शिल्लक राहिला होता.
मागील काही दिवसांपासून सोंटू फरार होता व त्याचा पोलिसांकडून शोध सुरू होता. पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सोंटूला गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून मंगळवारी त्याला न्यायालयात सादर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येईल.
२७ सप्टेंबरला उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर सोंटू हा त्याचा मित्र आणि गोंदियातील गुन्हेगार विक्की यादवसह नागपुरातून फरार झाला होता. विक्की अजूनही सोंटूसोबत आहे. ९ ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टानेही सोंटूचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्याला पोलिसांना शरण येण्यासाठी ७ दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी सोंटू आणि त्याच्या कुटुंबीयांच्या शोधण्यासाठी एक पथक राजस्थानला पाठविले होते.
सोंटू कधीही आत्मसमर्पण करू शकतो याची पोलिसांना कल्पना होती. सोमवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास त्याने प्रथम श्रेणी कनिष्ठ न्यायालयासमोर शरमागती पत्करली. त्याला लगेच गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले व मंगळवारी पोलीस कोठडीच्या मागणीसाठी न्यायालयासमोर सादर करण्यात येईल.