५९ ग्राहक ांचा पाणीपुरवठा खंडित
By admin | Published: July 13, 2016 03:31 AM2016-07-13T03:31:11+5:302016-07-13T03:31:11+5:30
महापालिकेच्या जलप्रदाय विभागामार्फत थकबाकीदारांसाठी पाणीबिलाची ५० टक्के थकबाकी एकमुस्त भरून बिलाची
मनपाची कारवाई : थकबाकीदारांच्या विरोधात धडक मोहीम
नागपूर : महापालिकेच्या जलप्रदाय विभागामार्फत थकबाकीदारांसाठी पाणीबिलाची ५० टक्के थकबाकी एकमुस्त भरून बिलाची पाटी कोरी करण्याची मोहीम राबविण्यात आली होती. या योजनेला लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु या आवाहनाला प्रतिसाद न देणाऱ्या उपभोक्त्यांचा पाणीपुरवठा खंडित करण्याची मोहीम जलप्रदाय विभागाने हाती घेतली आहे. मंगळवारी पहिल्याच दिवशी ५९ उपभोक्त्यांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
या योजनेचा लाभ न घेतलेल्या थकबाकीदारांना आता थकबाकीची संपूर्ण रक्कम भरावी लागणार आहे. अन्यथा त्यांचा पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून थकबाकी असल्याने उपभोक्त्यांना ही रक्कम भरता यावी. यासाठी जलप्रदाय समितीचे सभापती संदीप जोशी यांनी १६ ते ३० जून २०१६ दरम्यान थकबाकीत ५० टक्के सूट देण्याची योजना आणली होती.
यात बिलाची पाटी कोरी करण्याची संधी उपभोक्त्यांना मिळाली होती. या योजनेला लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. या योजनेचा लाभ न घेतल्यास थकबाकीबाबत भविष्यात कुठलाही अर्ज वा विनंती विचारात घेतली जाणार नाही, याची जाणीव थकबाकीदारांना करून दिली होती. परंतु हजारो थकबाकीदारांनी याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे थकबाकीदारांच्या विरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी महापालिका व ओसीडब्ल्यू यांनी झोननिहाय पथके गठित केलेली आहेत. पाणीपुरवठा खंडित होण्याची कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी बिलाची रक्कम भरावी. असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.(प्रतिनिधी)