मालखान्यात ५९ लाखांचा घोटाळा
By admin | Published: January 8, 2016 03:53 AM2016-01-08T03:53:32+5:302016-01-08T03:53:32+5:30
अंबाझरी पोलीस ठाण्याच्या मालखान्यातील ५८ लाख ८० हजाराच्या घोटाळ्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. डी. शुक्ला यांच्या न्यायालयाने ...
हेड कॉन्स्टेबलचा जामीन फेटाळला
नागपूर : अंबाझरी पोलीस ठाण्याच्या मालखान्यातील ५८ लाख ८० हजाराच्या घोटाळ्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. डी. शुक्ला यांच्या न्यायालयाने मालखानाप्रमुख हेड कॉन्स्टेबलचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
दिलीप सुदाम चौरपगार,असे आरोपी हेड कॉन्स्टेबलचे नाव आहे. तो २००४ पासून ८ डिसेंबर २०१५ या काळात अंबाझरी पोलीस ठाण्यात मालखान्याचा प्रमुख होता. सट्ट्याच्या आहारी जाऊन त्याने विविध गुन्ह्यात जप्त मालखान्यातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेचा अपहार केला. अंबाझरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब बाबूराव खाडे यांच्या तक्रारीवरून चौरपगारविरुद्ध ८ डिसेंबर २०१५ रोजी भादंविच्या ४०९ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच दिवशी त्याला अटकही करण्यात आली होती. मालखान्यातील सोन्याचे दागिने त्याने विविध सराफा व्यापाऱ्यांकडे गहाण ठेवून त्याने या संपूर्ण पैशांची उधळपट्टी केली होती. या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक (गुन्हे) सतीश गोराडे यांनी तपास करून सराफा व्यापाऱ्यांकडे गहाण असलेले दागिने जप्त केले होते. आतापर्यंत एकूण ७ लाख २६ हजार ८१७ रुपये किंमतीचे दागिने जप्त करण्यात आलेले आहेत. सध्या चौरपगार हा पोलीस खात्यातून निलंबित असून कारागृहात बंदिस्त आहे. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील वसंत नरसापूरकर यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)
वासनकरचे १४ लाख व एक किलो सोने हडपले
शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधीने लुबाडणाऱ्या प्रशांत वासनकर आणि इतरांविरुद्ध अंबाझरी पोलीस ठाण्यात ९ मे २०१४ रोजी भादंविच्या ४२०, ४०६, ४०९, ५०६, १२० (ब) आणि एमपीआयडी कायद्याच्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले होते. त्यानंतर २७ जुलै २०१४ रोजी आर्थिक गुन्हे पथकाकडून प्रशांत वासनकर, विनय वासनकर आणि अभिजीत चौधरी यांना अटक करण्यात आली होती. वासनकरकडून १४ लाख रुपये आणि ९३६ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले होते. रोख रक्कम बँकेत जमा करण्यात आली होती. रक्कम काढण्याचे आणि ठेवण्याचे अधिकार वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि चौरपगार या दोघांनाच होते. चौरपगार याने गैरफायदा घेत संपूर्ण १४ लाखांची रोख काढून घेऊन हडपली होती. पुढे बिंग फुटताच त्याने स्वत:चे भूखंड विकून पुन्हा ही रक्कम बँकेत जमा केली होती. मात्र संपूर्ण दागिने त्याने हडपले आहेत.