ट्रॅक्टर कंपनीतील ५९.५१ लाखांच्या साहित्याची चोरी, पाच आरोपी गजाआड
By दयानंद पाईकराव | Published: May 28, 2024 04:23 PM2024-05-28T16:23:37+5:302024-05-28T16:24:38+5:30
महेंद्रा अँड महेंद्रा ट्रॅक्टर कंपनीतील ५९ लाख ५१ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरी करणाऱ्या पाच आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे.
नागपूर : महेंद्रा अँड महेंद्रा ट्रॅक्टर कंपनीतील ५९ लाख ५१ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरी करणाऱ्या पाच आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे.
जितेंद्र दडमल (रा. लाडके ले आऊट, बालाजीनगर एमआयडीसी), गजेंद्र युवराज ठाकरे (२१), पराग युवराज ठाकरे (२४) दोघे रा. लाखांदुर जि. भंडारा, कामेश्वर वासुदेव देशमुख (३६, रा. आंभोरा, कुही जि. नागपूर) आणि पंकज आनंदराव बोरडे (२८, रा. कुळेगाव ता. लाखांदुर जि. भंडारा) अशी आरोपींची नावे आहेत. यातील चौघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून जितेंद्र दडमल अद्यापही फरार आहे.
महेंद्रा अँड महेंद्रा कंपनीत काम करणारे सुरक्षा प्रमुख मेजर मनु दिलीप अवस्थी (४८, रा. एमआयडीसी) यांना कंपनीत चोरी होत असल्याचे समजले. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा चेक केले असता २ फेब्रुवारी २०२४ ते २१ मे २०२४ दरम्यान आरोपींनी कंपनीतील टर्बो चार्जर, इंजेक्टर, हायड्रो स्टेरींग युनिट असा एकुण ५९ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे दिसले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ३८१, ३४ नुसार गुन्हा दाखल करून आरोपी गजेंद्र, पराग, कामेश्वर, पंकज यांना अटक केली असून पोलिस आरोपी जितेंद्र दडमलचा शोध घेत आहेत.