अबब! एकाच दिवशी रेल्वेत आढळले ५,९९८ फुकटे प्रवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2022 12:01 PM2022-10-29T12:01:35+5:302022-10-29T12:02:11+5:30

दंडाची कारवाई : ४२.१३ लाखांचा महसूल वसूल

5,998 passengers without tickets were found in the train on a single day | अबब! एकाच दिवशी रेल्वेत आढळले ५,९९८ फुकटे प्रवासी

अबब! एकाच दिवशी रेल्वेत आढळले ५,९९८ फुकटे प्रवासी

Next

नागपूर :रेल्वेत अवैध प्रवास करणाऱ्या ५९९८ प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून ४२.१३ लाखांचा दंड रेल्वे अधिकाऱ्यांनी वसूल केला. मध्य रेल्वेच्या नागपूर, वर्धा, आमला आणि बल्लारपूर रेल्वेस्थानक मार्गावर २७ ऑक्टोबरला ही विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.

वारंवार कारवाई करूनही अनेक प्रवासी अजूनही रेल्वेतून फुकट प्रवास करतात. काही जण तिकीट नसताना आरक्षित डब्यात चढतात तर काही पासधारक परवानगी नसताना वातानुकूलित डब्यातून प्रवास करतात. या आणि अशाच बेशिस्त प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी रेल्वेच्या नागपूर विभागीय व्यवस्थापक रुचा खरे आणि वाणिज्य व्यवस्थापक कृष्णनाथ पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विशेष तपासणी मोहिमेचे आदेश दिले. त्यानुसार, रेल्वे अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या पथकांनी गुरुवारी २७ ऑक्टोबरला नागपूर, वर्धा, आमला आणि बल्लारपूर रेल्वे मार्गावरील गाड्यांमध्ये विशेष तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत फुकट्या प्रवाशांसह रेल्वेत अवैध प्रवास करणारे ५,९९८ बेशिस्त प्रवासी अधिकाऱ्यांच्या हाती लागले. त्यांच्याकडून रेल्वे अधिकाऱ्यांनी दंडापोटी ४२ लाख १३ हजारांची रक्कम वसूल केली.

विक्रमी दंडाची कारवाई

अशा प्रकारची तपासणी आणि कारवाईची मोहीम नेहमीच रेल्वे प्रशासनातर्फे वेगवेगळ्या मार्गावर राबविण्यात येते; मात्र एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवासी पकडण्याची आणि त्यांच्याकडून एवढ्या मोठ्या रकमेचा दंड वसूल करण्याची आतापर्यंतची ही सर्वात मोठी अर्थात रेकॉर्डब्रेक कारवाई असल्याचे रेल्वे अधिकारी सांगतात.

प्रवाशांना आवाहन

या कारवाईनंतर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना योग्य तिकिटांसह वैध प्रवास करण्याचे आवाहन एका पत्रकातून केले आहे. आपल्या मोबाईलच्या माध्यमातून प्रवासी पेपरलेस प्रवास तिकीट, सिझन तिकीट तसेच प्लॅटफॉर्म तिकीट घेऊ शकतात. तशी सुविधा मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून करून देण्यात आली असून, तपासणीच्या वेळी प्रवासी रेल्वे अधिकाऱ्यांना मोबाईल ॲपवरूनच तिकीट दाखवू शकतात, असेही या पत्रकात रेल्वे प्रशासनाने नमूद केले आहे.

Web Title: 5,998 passengers without tickets were found in the train on a single day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.