आठ आसनी वाहनांत आता ६ एअरबॅग अनिवार्य; अधिसूचनेचा मसुदा मंजूर, नितीन गडकरींची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 08:19 AM2022-01-15T08:19:00+5:302022-01-15T08:19:11+5:30
प्रवासी मोटर वाहनाच्या दोन बाजूंच्या दोन एअरबॅग्ज आणि दोन्ही बाजूंच्या ट्यूब एअरबॅग्ज आतील सर्व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहेत.
नागपूर : आठ प्रवासी वाहून नेणाऱ्या मोटर वाहनातील प्रवाशांची सुरक्षितता वाढविण्यासाठी किमान ६ एअरबॅग अनिवार्य करण्यात येत आहेत. त्यासाठी जीएसआर अधिसूचनेच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली.
भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने १ जुलै २०१९ पासून चालकासाठी एअरबॅग आणि १ जाने २०२२ पासून चालकाशेजारी बसलेल्या सहप्रवासी व्यक्तीला एअरबॅग फिटमेंटची अंमलबजावणी अनिवार्य केली होती. मोटर वाहनाच्या पुढील आणि मागील बाजूस बसलेल्या प्रवासी व्यक्तींना पुढच्या बाजूने आणि शेजारील बाजूने अपघात झााल्यास अपघाताचा प्रभाव किंवा नुकसान कमी करण्यासाठी मोटर वाहनात बसलेल्या व्यक्तीला अपघाताची इजा होऊ नये यासाठी एम-१ वाहन श्रेणीमध्ये ४ अतिरिक्त एअरबॅग अनिवार्य केल्या जातील असा निर्णयही घेण्यात आल्याची माहिती गडकरी यांनी दिली.
प्रवासी मोटर वाहनाच्या दोन बाजूंच्या दोन एअरबॅग्ज आणि दोन्ही बाजूंच्या ट्यूब एअरबॅग्ज आतील सर्व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहेत. देशातील मोटार वाहन अधिक सुरक्षित बनविण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. वाहनाचा प्रकार व किंमत कितीही असली तरी नवीन नियमामुळे मोटार वाहनातील प्रवासी सुरक्षित होतील, असे गडकरी यांनी म्हटले आहे.