दोन दिवसांत दारुवर दीड लाख उधळले, नशेत त्याचे ६ लाख पळविले

By योगेश पांडे | Published: September 2, 2022 05:34 PM2022-09-02T17:34:45+5:302022-09-02T17:45:43+5:30

त्यांनी दुसऱ्या दिवशी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली.

6 lakh has stolen from a drunk man who spent 1.75 lakh on liquor in 2 days | दोन दिवसांत दारुवर दीड लाख उधळले, नशेत त्याचे ६ लाख पळविले

दोन दिवसांत दारुवर दीड लाख उधळले, नशेत त्याचे ६ लाख पळविले

Next

नागपूर : दारूच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीचे सहा लाख पळविणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनीअटक केली आहे. ही घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली व पोलिसांनी काही तासांतच आरोपींना अटक केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे संबंधित व्यक्तीने दारुभट्टीत दोन दिवसांत दीड लाख रुपये दारुवर उडविले होते.

सावनेर येथील निवासी विजय निकाळजे (५०) हे पत्नीशी झालेल्या वादातून नागपूरला निघून आले. २८ ऑगस्ट रोजी ते परत सावनेरला गेले व कपाटातून शेतीच्या विक्रीतून मिळालेले साडेसात लाख रुपये घेऊन आले. सावनेरहून पैसे आणल्यानंतर निकाळजे यांनी थेट दारुभट्टी गाठली व २८-२९ ऑगस्ट रोजी दिवसभर दारू पिली. सोबतच त्यांनी दारुभट्टीतील इतर लोकांनादेखील दारू पाजत दोन दिवसांत दीड लाख रुपये उधळले.

२९ ऑगस्ट रोजी दिवसभर दारु पिल्यावर रात्री अकरा वाजता ते शिवाजी नगर येथील त्यांच्या जुन्या घरी झोपायला गेले. यावेळी त्यांच्याजवळील पिशवीत सहा लाख रुपये रोख होते व ते पैसे उशाशी घेऊन ते झोपी गेले. ३० ऑगस्ट रोजी दीड वाजता झोपेतून उठले असता त्यांना पैशांची पिशवी नसल्याचे आढळले. त्यांनी दुसऱ्या दिवशी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली.

पोलिसांनी खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून तपास सुरू केला असता अगोदरपासूनच ‘रेकॉर्ड’वर असलेल्या चार आरोपींची नावे समोर आली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला. रोहित मंगलसिंग चौहान (२१), कुणाल प्रभाकर डगवार (२२), अभिषेक तांबूसकर (२१) व गौरव उर्फ गुड्डू लक्ष्मण नागपुरे (२४) अशी आरोपींची नावे असून ते चौघेही शिवाजीनगरातीलच रहिवासी आहेत.

Web Title: 6 lakh has stolen from a drunk man who spent 1.75 lakh on liquor in 2 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.