कृषी प्रक्रिया उद्योगांसाठी ६ हजार कोटींचा निधी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 05:39 AM2023-08-16T05:39:47+5:302023-08-16T05:40:13+5:30
शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : शेतकऱ्यांसाठी सरकार ॲग्री बिझनेस व्यवस्था उभारत आहे, त्याचप्रमाणे प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी सहा हजार कोटींचा निधी खर्च करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. स्वातंत्र्य दिनानिमित्त नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे, तोपर्यंत सन्मानाने हा तिरंगा फडकत राहील, अशा प्रकारची प्रार्थना करत असल्याचे फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. पीक विमा, कर्जमाफी योजना, कर्ज पुनर्गठन योजना आदींद्वारे सरकार शेतकऱ्यांना मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीमध्ये ५०० विशेष पाहुणे बोलवले आहेत. ज्यामध्ये शेतकरी आहेत, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे लोक आहेत, सामान्य कार्यकर्ते, सफाई कर्मचारी, बांधकाम कामगार आहेत. स्वातंत्र्याच्या महोत्सवात प्रत्येक घटकाला सोबत घेण्याचे काम पंतप्रधानांनी केल्याचे फडणवीस म्हणाले.
गडचिरोलीच्या पोलिसांचे शौर्य
- गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांनी दाखविलेल्या शौर्यामुळे त्यांना पदके मिळाली आहेत.
- या वर्षात ६४ पदके मिळाली आहेत.
- देशात कदाचित सर्वाधिक पदके गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांना मिळाली आहेत.
- गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही फडणवीस म्हणाले.