आयबीपीएस-एलआयसी अधिकारी पदासाठी मोफत प्रशिक्षणासह दरमाह ६ हजार विद्यावेतन
By आनंद डेकाटे | Published: August 23, 2023 04:27 PM2023-08-23T16:27:10+5:302023-08-23T16:28:14+5:30
महाज्योती : २१ सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज
नागपूर : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत यंदा इन्स्टिट्यूशन ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनच्या (आयबीपीएस) प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) तसेच भारतीय जीवन बीमा निगम (एलआयसी)तर्फे असिस्टंट अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (एएओ) या पदासाठी महाज्योतीमार्फत नागपूर व छत्रपती संभाजी नगर या दोन शहरात एकूण ६०० विद्यार्थ्यांना मोफत अनिवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना येत्या २१ स्पटेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. विशेष म्हणजे ६ महिने होणाऱ्या या प्रशिक्षणासाठी महाज्योतीतर्फे निवड झालेल्या विद्यार्थी ज्यांची हजेरी ७५ टक्के असणार अश्याना दरमाह ६ हजार रूपए विद्यावेतन संस्थेमार्फत देण्यात येणार आहे. अशी माहिती महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी दिली.
महाज्योती या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीयकृत बॅंक आणि एलआयसीच्या होणाऱ्या अधिकारी पदांच्या परीक्षेत यश प्राप्त करण्यासाठी सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवार हा इतर मागास वर्ग विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गापैकी असावा. तसेच उमेदवार हा नाॅन क्रिमीलेअर उत्पन्न गटातील असावे. जे विद्यार्थी हे पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या किंवा पदवीच्या अंतिम वर्षाला असणारे विद्यार्थी सुद्धा या प्रशिक्षणकरिता ऑनलाईन अर्ज करू शकतात. उपरोक्त होणाऱ्या प्रशिक्षणाकरिता 30 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित आहे. तसेच अनाथांसाठी १ टक्के जागा आरक्षित करण्यात आली आहे. या प्रशिक्षणची वयोमर्यादा ही २० ते ३३ राहील.
- अधिक माहितीसाठी कॉल सेंटरची सुविधा
अर्ज भरतांना विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये म्हणून महाज्योतीतर्फे कॉल सेंटरची सुविधा सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी ०७१२-२८७०१२०-२१ या संपर्क क्रमांकावर किंवा इमेल आईडी: महाज्योतीनीट२४ /जिमेल.कॉम वर आपल्या अर्जातील साशंकता दुरू करता येणार.