नशेसाठी ६ ट्राफिक बुथमधील बॅटरी, इव्हर्टर चोरून केली विक्री
By दयानंद पाईकराव | Published: May 4, 2024 04:56 PM2024-05-04T16:56:57+5:302024-05-04T16:57:54+5:30
तीघांना अटक : गुन्हे शाखेच्या युनिट २ ची कामगिरी
नागपूर : दारु, गांजा व सर्व प्रकारच्या नशेच्या आहारी गेल्यामुळे नशा भागविण्यासाठी शहरातील ६ ट्राफिक बुथमधील बॅटरी, इव्हर्टर व इतर साहित्याची विक्री करणाऱ्या तीन आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट २ ने गजाआड केले आहे.
आशिष उर्फ बोंड्या यादवराव चौधरी (४३, रा. ख्रिश्चन कॉलनी, गौतमनगर, कडबी चौक, जरीपटका), राजेश लक्ष्मीनारायण कुशवाह (३८, रा. सिंधी कॉलोनी, नरसिंगपूर, मध्यप्रदेश, ह. मु. मिठानिम दर्गाजवळ, फुटपाथवर) आणि शेख ईमरान शेख अकबर (३२, रा. एकतानगर, पिवळी नदी, यशोधरानगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना दारु, गांजा व सर्व प्रकारची नशा करण्याची सवय आहे. नशा भागविण्यासाठी त्यांनी शहरातील ट्राफिक बुथमधील साहित्य चोरी करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी गड्डीगोदाम चौकातील ट्राफिक बुथमधून एक एक्साईड कंपनीची बॅटरी, एक हॅवल कंपनीचा सोलर इव्हर्टर, एक एम्पली फायर व प्रथमोपचार पेटी असा एकुण २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. या प्रकरणी हवालदार प्रकाश नागपूरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या अधिकारी व अंमलदारांना तांत्रीक तपास व मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी सदर ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी, सीताबर्डी, धंतोली व गणेशपेठ हद्दीतून प्रत्येकी एका ठिकाणी असे मिळून एकुण सहा ट्राफिक बुथमध्ये चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले. आरोपींच्या ताब्यातून ६ एक्साईड कंपनीच्या बॅटरी, हॅवल्स कंपनीचा सोलर इन्व्हर्टर, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकुण २ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच हा मुद्देमाल विकत घेणाऱ्या भंगार व्यावसायिकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींना युनिट २ च्या निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी सदर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.