नागपूर रेल्वे स्थानकावर आढळल्या ६ बेवारस बॅग, आरपीएफची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 10:37 AM2021-09-24T10:37:37+5:302021-09-24T10:45:06+5:30
आरपीएफला तेलंगाणा एक्स्प्रेसमधून मद्याची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यामुळे तेलंगाणा एक्सप्रेस नागपूर स्थानकावर येताच आरपीएफ तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या संयुक्त पथकाने ०२७२४ कोचमध्ये तपासणी सुरू केली. दरम्यान एस- ८ कोचमध्ये ६ बॅग बेवारस स्थितीत आढळून आल्या.
नागपूर : रेल्वे स्थानकावर तेलंगाणा एक्स्प्रेसमधून १ लाख ७ हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आरपीएफच्या पथकाने केली.
आरपीएफला तेलंगाणा एक्स्प्रेसमधून मद्याची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे आरपीएफ तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या संयुक्त पथकाने ०२७२४ तेलंगाणा एक्सप्रेस नागपूर स्थानकावर येताच कोचमध्ये तपासणी सुरू केली. दरम्यान एस- ८ कोचमध्ये ६ बॅग बेवारस स्थितीत आढळून आल्या. पथकाने या बॅगबाबत कोचमध्ये चौकशी केली. मात्र कोणीच त्या आपल्या असल्याचं सांगितलं नाही. त्यामुळे या बॅग उतरवून ठाण्यात आणण्यात आल्या. या बॅग्समध्ये मद्याच्या १०५ बाटल्या आढळून आल्या.
या मद्याची निर्मिती हरियाणा राज्यात झाली आहे. एकूण मद्यसाठा १ लाख ७ हजार ८२० रुपये किमतीचा आहे. जप्त करण्यात आलेला मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सुपुर्द करण्यात आला. ही कारवाई आरपीएफ आयुक्त आशुतोष पांडेय यांच्या मार्गदर्शनात आरपीएफ निरीक्षक आर.एल. मीना यांच्या नेतृत्वात सहायक उपनिरीक्षक रामनिवास यादव, प्राधान आरक्षक ब्रिजेशकुमार, आरक्षक मुनेश गौतम, जसवीर सिंह, राजेश गडपलवार, विवेक कनोजिया, मणिशंकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक केशव चौधरी, जवान अर्शील मिर्झ व उमेश सोनोने यांनी केली.