कुत्रा मागे धावला अन् सहा वर्षांच्या चिमुकलीचा जीव गेला; नागपुरातील दुर्दैवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 04:49 PM2022-12-20T16:49:53+5:302022-12-20T16:50:12+5:30
कारखाली चिरडून मृत्यू
नागपूर : तसे तिचे खेळण्याचे-बागडण्याचे वय असताना, ती पोट भरण्यासाठी कुटुंबीयांसह खेळणी विकत होती. मात्र, चौकात खेळणे विकत असताना भटका कुत्रा मागे धावला, बचावासाठी ती धावत निघाली, पण हाय रे दैवा! ती थेट भरधाव कारच्या चाकाखाली आली आणि क्षणात तिच्या आयुष्याच्या खेळण्याचेच तुकडे झाले. इमामवाडा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या अप्सरा चौकात ही दुर्दैवी घटना घडली. सुमन जोधराज बागडी असे मृत बालिकेचे नाव आहे.
सुमनचे नातेवाईक मूळचे राजस्थानचे आहेत. ते भटके जीवन जगतात. संपूर्ण कुटुंब वेगवेगळ्या शहरात फिरून खेळणी विकण्याचे काम करतात. काही दिवसांपासून सुमनचे कुटुंबीय रेशीमबाग येथे राहून खेळणी व इतर वस्तू विकत होते. रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सुमन आपल्या कुटुंबियांसह अप्सरा चौकात खेळणी विकत होती. या दरम्यान एक मोकाट कुत्रा सुमनच्या दिशेने धावत आला. त्यामुळे घाबरलेली सुमन पळू लागली. सुसाट धावत सुटलेली सुमन थेट मार्गावरून भरधाव जाणाऱ्या एमएच १२-इएक्स-४१३० या कारच्या चाकाखालीच आली. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली व कार चालकाला अटक केली आहे.
चौकचौकात मुलांना धोका, कुत्र्यांवर नियंत्रण कधी?
शहरातील अनेक चौकांमध्ये अल्पवयीन मुले खेळणी, पेन व इतर दैनंदिन वापराच्या वस्तू विकताना किंवा भीक मागताना दिसतात. वाहतूक सिग्नल बंद होताच ही अल्पवयीन मुले वाहनांकडे येतात. यातून अपघाताचा धोका संभवतो. शहरातील बहुतांश मोठ्या चौकात हीच परिस्थिती आहे. ते रोखण्यासाठी कोणतीही पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. दुसरीकडे मोकाट कुत्र्यांची दहशत कायम असून, न्यायालयाने वेळोवेळी फटकारल्यानंतरही त्याच्यावर तोडगा निघालेला नाही.