पदवी परीक्षांना ‘६०:४०’ प्रणाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2016 03:17 AM2016-05-03T03:17:07+5:302016-05-03T03:17:07+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांचे ‘ड्रीम प्रोजेक्ट’ अखेर प्रत्यक्षात

The '60: 40' system for the degree tests | पदवी परीक्षांना ‘६०:४०’ प्रणाली

पदवी परीक्षांना ‘६०:४०’ प्रणाली

Next

नागपूर विद्यापीठ : विद्वत् परिषदेची मान्यता, पुढील सत्रापासून अंमलबजावणी
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांचे ‘ड्रीम प्रोजेक्ट’ अखेर प्रत्यक्षात येणार आहे. नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल होणार असून सर्व पदवी परीक्षा ६०:४० या ‘पॅटर्न’नुसार होणार आहेत. प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी यासंदर्भात पुढाकार घेतला व विद्वत्त परिषदेने याला मान्यता दिली. २०१६-१७ या शैक्षणिक सत्रापासून परीक्षेची ही प्रणाली राबविण्यात येणार आहे.
आजच्या परीक्षा प्रणालीमुळे नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागावर प्रचंड ताण वाढला आहे. परीक्षा विभाग हा विद्यापीठाचा पाठीचा कणा असतो, परंतु तो कोलमडायला आला आहे. अशा स्थितीत विद्यापीठाला खरोखरच प्रगती करायची असेल तर नवीन परीक्षा प्रणालीची अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचा मानस कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी पदग्रहण करताना बोलून दाखविला होता.
त्यासंदर्भात पुढे विचार सुरू झाला व प्र-कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली सर्वच पदवी अभ्यासक्रमांना ६०:४० परीक्षा प्रणालीचा आराखडा तयार करण्यासाठी समिती बसविण्यात आली. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचा खरा कस लागणार आहे. शिवाय विद्यापीठावरील ताणदेखील कमी होईल. याची अंमलबजावणी पुढील सत्रापासूनच करण्यात येईल, असे प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)

अभियांत्रिकीच्या प्राचार्यांचा अगोदरच होकार
४सुरुवातीला नागपूर विद्यापीठाकडून अभियांत्रिकीच्या परीक्षांमध्ये आमूलाग्र बदल करण्याची तयारी सुरू झाली होती. त्यानुसार पुढील सत्रापासून विद्यापीठाकडून केवळ ६० टक्के गुणांचीच वस्तुनिष्ठ परीक्षा घेतली जाईल, तर ४० टक्के परीक्षांचा भार महाविद्यालयांवर असेल असे ठरविण्यात आले होते. विद्यापीठात सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्राचार्यांचीदेखील या नव्या प्रणालीला लागू करण्यासंदर्भात होकार दिला होता.

अशी आहे ‘६०:४०’ प्रणाली
या ‘६०:४०’ प्रणालीनुसार विद्यार्थ्यांच्या दोन परीक्षा होतील. यातील ४० टक्के गुणांची परीक्षा ही महाविद्यालयाकडून घेण्यात येईल व त्यात विस्तारपूर्वक उत्तरे लिहिण्याची संधी असेल. विद्यापीठाकडून ६० टक्के गुणांची वस्तुनिष्ठ पद्धतीची परीक्षा घेण्यात येईल. विद्यार्थ्यांना यात केवळ अचूक उत्तरांना खूण करावी लागेल. विद्यापीठाच्या परीक्षेसाठी प्रश्नांची ‘बँक’ तयार करण्यात येतील व विद्यार्थ्यांना विविध प्रश्नपत्रिकांचे संच देण्यात येतील. याचे मूल्यांकन ‘आॅनलाईन’ पद्धतीनेच होईल व आठ दिवसात निकाल जाहीर होऊ शकतील. विद्यार्थ्यांच्या मनात शंका असेल तर त्यांना योग्य उत्तरांसोबतच ‘आॅनलाईन’ उत्तरपत्रिका पुरविण्यात येतील.

विद्यार्थ्यांपुढील आव्हान वाढणार
आताच्या परीक्षा प्रणालीनुसार ‘इंटर्नल’ गुणांच्या आधारावर विद्यार्थी सहजपणे उत्तीर्ण होऊन जातात. परंतु जर ‘६०:४०’ प्रणाली लागू झाली तर विद्यार्थ्यांसमोरील अडचणी वाढणार आहेत. दोन्ही परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळे उत्तीर्ण होणे आवश्यक असेल. दरम्यान,नागपूर विद्यापीठात विविध विद्याशाखांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी निरनिराळे नियम आहेत. कुठे उत्तीर्ण होण्यासाठी ५० टक्के गुण आवश्यक आहेत, तर काही अभ्यासक्रमांमध्ये ३५ टक्के गुण घेतलेला विद्यार्थी उत्तीर्ण होतो. विद्यापीठात उत्तीर्ण होण्यासाठी समान पद्धत लागू करण्याचा विद्यापीठाचा विचार आहे. यासंदर्भात प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली ६ मे रोजी विशेष बैठक होणार आहे. यात संबंधित निर्णय घेण्यात येईल. पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के तर पदवी अभ्यासक्रमांत उत्तीर्ण होण्यासाठी ४० टक्के गुण आवश्यक असल्याच्या प्रस्तावावर या बैठकीत निर्णय घेण्यात येईल.

प्रणालीचे फायदे
४परीक्षा विभागावरील ताण कमी होईल.
४निकालांचा वेग वाढेल.
४फेरमूल्यांकनाची प्रणालीच बंद होईल.
४गैरप्रकार कमी होतील.
४विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी तयार होतील.
४प्राध्यापकांना देण्यात येणारा मानधनाचा खर्च वाचेल.

Web Title: The '60: 40' system for the degree tests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.