६० घरफोड्या करणारा गुन्हेगार जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:13 AM2020-12-05T04:13:31+5:302020-12-05T04:13:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५० ते ६० चोऱ्या घरफोड्या करणारा अट्टल गुन्हेगार संजय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५० ते ६० चोऱ्या घरफोड्या करणारा अट्टल गुन्हेगार संजय मधुकर मून (वय ४९) याच्या मुसक्या बांधण्यात तहसील पोलिसांनी यश मिळवले.
आरोपी मून बेला (उमरेड) येथील रहिवासी आहे. तो पोलिसांना चुकविण्यासाठी सध्या हिंगणाजवळच्या सामगाव येथे राहत होता. ११ नोव्हेंबरला दुपारी भानखेड्यातील तुळजाई मंदीराजवळ राहणारे मोहम्मद अल्ताफ मोहम्मद यासिन (वय ५०)यांच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्याने रोख ७० हजार तसेच१५ ग्राम सोन्याचे दागिने चोरून नेले होते. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली
तहसील पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करताना आरोपी संजय मूनच्या १ डिसेंबरला मुसक्या बांधल्या. त्याच्याकडून ४८०० रुपये तसेच सोन्याचे दागिने जप्त केले. या गुन्ह्यासोबतच त्याने अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या एका गुन्ह्याचीही कबुली दिली. त्याच्याकडून आणखीही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
---
आरोपी मून हाअट्टल गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध शहरातील विविध भागात चोरी घरफोडीचे सुमारे ५० ते ६० गुन्हे दाखल आहेत. गुन्हे करणे, पोलिसांकडून अटक होणे, कारागृहात जाणे आणि जामिनावर बाहेर आल्यानंतर परत गुन्हे करणे, अशी त्याची सायकलिंग सुरूच असते.