एमबीबीएसच्या ५० जागांसाठी ६० कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 05:03 AM2019-09-30T05:03:08+5:302019-09-30T05:03:46+5:30
राज्यातील खासगीसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (ईडब्ल्यूएस) १० टक्के आरक्षण लागू करण्याकरिता ‘एमबीबीएस’च्या ९७० जागा वाढविण्यात आल्या.
नागपूर : राज्यातील खासगीसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (ईडब्ल्यूएस) १० टक्के आरक्षण लागू करण्याकरिता ‘एमबीबीएस’च्या ९७० जागा वाढविण्यात आल्या. यामुळे २७६० वरून ३७३० जागा झाल्या. दरम्यानच्या काळात वाढीव जागेला घेऊन पायाभूत सोयींचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यावर गुरुवारी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत एमबीबीएसच्या प्रत्येकी ५० जागांसाठी ६० कोटी देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा खर्च बांधकाम, यंत्रसामुग्री व लायब्ररीवर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
राज्यातील १७ महाविद्यालयात एमबीबीएसच्या ५० जागा वाढविण्यात आल्या आहेत. तिथे पायाभूत सोयी उभ्या करण्यासाठी प्रत्येक जागेकरीता १.२५ कोटी निधी म्हणजे ६० कोटी देण्यात येणार आहेत. यातील ६० टक्के निधी केंद्र तर उर्वरित ४० टक्के निधीचा वाटा राज्य शासन उचलणार आहे. हा निधी वसतिगृह, लेक्चर हॉल, लायब्ररी, वाढीव खाटा व यंत्रसामुग्रीवर खर्च केला जाईल.