६० दिवसापासून नव्यांच्या तुलनेत अधिक रुग्ण बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:07 AM2021-06-30T04:07:09+5:302021-06-30T04:07:09+5:30
नागपूर : कोरोना बाधितांचा आकडा कमी होऊ लागला असला तरी मागील ६० दिवसापासून नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ...
नागपूर : कोरोना बाधितांचा आकडा कमी होऊ लागला असला तरी मागील ६० दिवसापासून नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक राहिली आहे. मंगळवारी १९ रुग्णांची भर पडली असताना सात पटीने १३८ रुग्ण बरे झाले. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९८.०५ टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्णांची एकूण संख्या ४,७७,०२७ तर, मृतांची संख्या ९,०२५ असून मागील चार दिवसापासून स्थिरावली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल महिन्यात रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. परंतु मे महिन्यापासून रुग्णसंख्येत घट होऊ लागली. ३० एप्रिल रोजी
पहिल्यांदाच ६,४६१ नव्या रुग्णांची नोंद झाली असताना, त्याच्या अधिक, ७,३८८ रुग्ण बरे झाले. त्यानंतर सलग दोन महिने नव्यांच्या तुलनेत कोरोनातून मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त राहिली. आज ७,०७८ चाचण्या झाल्या. पॉझिटिव्हिटीचा दर ०.२६ टक्के होता. शहरात ५,४९४ चाचण्यातून ११ नवे रुग्ण आढळून आले. पॉझिटिव्हिटीचा दर ०.२० टक्के होता. ग्रामीणमध्ये १,५८४ चाचण्यातून ८ रुग्णांची भर पडली असून, पॉझिटिव्हिटीचा दर ०.५० टक्के होता. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ झाली. कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ४०२ झाली. यात शासकीय व खासगी रुग्णालयात १५२ तर होम आयसोलेशनमध्ये २५० रुग्ण आहेत. सलग चौथ्या दिवशी शून्य मृत्यूची नोंद झाली.
:: कोरोनाची मंगळवारची स्थिती
दैनिक चाचण्या: ७,०७८
शहर : ११ रुग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : ८ रुग्ण व ० मृत्यू
ए. बाधित रुग्ण :४,७७,०२७
ए. सक्रिय रुग्ण : ४०२
ए. बरे झालेले रुग्ण : ४,६७,६००
ए. मृत्यू : ९,०२५