नागपूरमध्ये रंगणार सलग ६० तासांचे नाट्यसंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 10:46 AM2019-02-13T10:46:33+5:302019-02-13T10:49:13+5:30

मुलुंड येथील ९८ व्या नाट्य संमेलनाप्रमाणे नागपूरचे संमेलनही सलग ६० तास चालणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

60 hour's Natya Samalan in Nagpur | नागपूरमध्ये रंगणार सलग ६० तासांचे नाट्यसंमेलन

नागपूरमध्ये रंगणार सलग ६० तासांचे नाट्यसंमेलन

Next
ठळक मुद्देझाडीपट्टीचे नाटकखेडकरांचा फुल्ल कॉमेडी तमाशा रंगणार कार्यक्रम पत्रिकेसाठी मॅरेथॉन बैठक

निशांत वानखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : येत्या २२ फेब्रुवारीपासून नागपूर येथे होऊ घातलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. हे संमेलन वैदर्भीय नाट्यरसिकांच्या चिरकाल आठवणीत राहावे यासाठी अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या आयोजन समितीची मॅरेथान बैठक सध्या मुंबई येथे सुरू आहे. मुलुंड येथील ९८ व्या नाट्य संमेलनाप्रमाणे नागपूरचे संमेलनही सलग ६० तास चालणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. विशेष म्हणजे मुलुंडच्या संमेलनात रात्रभर सुरू असलेल्या कार्यक्रमांना रसिकांनीही हाऊसफुल्ल दाद दिली होती. तोच प्रतिसाद नागपूरच्या संमेलनात मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

२२ ते २५ फेब्रुवारीदरम्यान सुरेश भट सभागृह आणि रेशीमबाग मैदानाच्या परिसरात हे संमेलन चालणार आहे. २२ ला दुपारी ३ वाजता शहरात वाजतगाजत निघणाऱ्या नाट्य दिंडीने संमेलनाला सुरुवात होईल. सायंकाळी ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्याहस्ते संमेलनाचे उद््घाटन होणार आहे.
याप्रसंगी ९९ व्या नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी उपस्थित राहतील. मिळालेल्या माहितीनुसार उदघाटन झाल्यानंतर लगेच संमेलनातील कार्यक्रमाला सुरुवात होणार असून २५ फेब्रुवारीच्या पहाटेपर्यंत नाट्यनगरीत सलग कार्यक्रम रंगणार आहेत. म्हणजेच दिवसरात्र कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. अभिनेता भरत जाधव यांच्या अफलातून अभिनयाने गाजलेले ‘पुन्हा सही रे सही’ हे व्यावसायिक नाटक नाट्य संमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. ज्येष्ठ गायिका देवकी पंडित यांच्या सुफी गीतांवर आधारित मुक्ती संगीतमय कार्यक्रमाची पर्वणीही नागपूरकरांना अनुभवायला मिळणार आहे. याशिवाय संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांची प्रकट मुलाखतही होणार आहे. दिग्गज नाट्यकर्मींचा सत्कार यादरम्यान होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अ. भा. मराठी नाट्य परिषद, नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल्ल फरकासे यांना याबाबत विचारणा केली असता, माहितीबाबत सकारात्मक संकेत दिले. मात्र मुंबईतील बैठकीबाबत माहिती नसल्याचे सांगत कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती बुधवारी देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
नागपूरलाही संमेलन बैठक
नाट्य संमेलनाच्या पूर्वरंग अंतर्गत आजपासून महापौर करंडकाच्या एकांकिका स्पर्धेला सुरुवात होत आहे. दरम्यान संमेलनाच्या कार्यक्रमांसाठी आयोजन समितीतील तानाजी वनवे, प्रवीण दटके, नागेश सहारे यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांची बैठक मंगळवारी नागपूरला पार पडली. प्रफुल्ल फरकासे यांनी सांगितले की, संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध कामाच्या २२ समित्या बनविण्यात आल्या आहेत. या समित्यांमध्ये शहरातील सर्व नाट्यकर्मी आणि नाटकांवर प्रेम करणाºया लोकांनी संमेलनाची जबाबदारी स्वीकारली आहे. सर्व लोक जोमाने तयारीला लागले असून बुधवारी संमेलनात होणाºया कार्यक्रमांबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गाजलेल्या एकांकिकाही ठरणार आकर्षण
संमेलनादरम्यान विदर्भात लोकप्रिय असलेल्या झाडीपट्टीच्या अस्सल नाटकांचा आनंद रसिकांना मिळणार आहे. झाडीपट्टीच्या दोन नाटकांचा यामध्ये समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय रघुवीर खेडकर यांचा तुफान गाजलेला फुल्ल कॉमेडी तमाशा हे आयोजनातील आणखी एक आकर्षण ठरणार आहे. २३ रोजी हा तमाशा होईल, अशी माहिती आहे. यासोबतच विकास आमटे यांच्या संकल्पनेतून आनंदवन येथे साकारलेल्या स्वरावनंदन हा संगीतमय कार्यक्रम २५ फेब्रुवारीला होणार आहे. तसेच विदर्भातील महाविद्यालयीन तरुणांच्या गाजलेल्या एकांकिकाही संमेलनात सादर होणार असल्याची माहिती आहे.

Web Title: 60 hour's Natya Samalan in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.