विदर्भात कोरोनाच्या रुग्णांत ६० टक्के वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 12:27 PM2020-10-02T12:27:43+5:302020-10-02T12:28:04+5:30
¸corona Nagpur News मागील सात महिन्याच्या तुलनेत विदर्भात एकट्या सप्टेंबर महिन्यात ६० टक्के नव्या रुग्णांची भर पडली. मृतांची संख्याही ६० टक्क्याने वाढली.
सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात कोरोनाचे संकट आणखीच गडद होत चालले आहे. मागील सात महिन्याच्या तुलनेत एकट्या सप्टेंबर महिन्यात ६० टक्के नव्या रुग्णांची भर पडली. मृतांची संख्याही ६० टक्क्याने वाढली. दिलासादायक म्हणजे, ७१ टक्के रुग्ण बरे झाले. सप्टेंबर महिन्यात रुग्ण व मृतांच्या संख्येत झालेली वाढ पाहता ऑक्टोबर महिना कसा राहील, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
अकाराही जिल्ह्यात कोरोनाची दहशत आहे. मात्र, अमरावती विभागाच्या तुलनेत नागपूर विभागात अधिक रुग्ण व मृत्यूची नोंद होत आहे. नागपूर विभागात नागपूर जिल्ह्यासह आता चंद्रपूर, गोंदिया, भंडारा व वर्धा जिल्ह्यात रुग्ण झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. नागपूर जिल्ह्यात ७९ हजार, चंद्रपूर जिल्ह्यात १० हजार, भंडारा जिल्ह्यात पाच हजार, गोंदिया जिल्ह्यात सहा हजार, वर्धा जिल्ह्यात चार हजार तर गडचिरोली जिल्ह्यात अडीच हजारांवर रुग्णांचा आकडा ओलांडला. अमरावती विभागात सर्वाधिक रुग्ण अमरावती विभागात आहेत. या जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येने १३ हजाराचा आकडा पार केला. सोबतच यवतमाळ जिल्ह्याने आठ हजार, अकोला जिल्ह्याने सात हजार, बुलडाणा जिल्हाने सात हजार तर वाशिम जिल्ह्याने चार हजार रुग्णसंख्येचा टप्पा ओलांडला आहे.
-८८,७७९ नवे रुग्ण व २,४०८ मृत्यू
३० सप्टेंबर रोजी रुग्णांची एकूण संख्या १,४९,११७ व मृतांची संख्या ३,९९७ वर गेली. या महिन्यात तब्बल ८८,७७९ रुग्णांची व २,४०८ मृत्यूंची भर पडली. आतापर्यंत एकूण १,१४,७२८ रुग्ण बरे झाले. या महिन्यात सर्वाधिक ८१,५६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले.
-सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाचे
::१८ आणि २४ तारखेला मृत्यूच्या आकड्याने दोनदा शंभरी गाठली
:: रोजच्या बाधित रुग्णांच्या तुलनेत नऊवेळा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक होती