सूरतमध्ये सापडला ६० लाख रुपये फसवणुकीचा सूत्रधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 11:45 PM2019-03-04T23:45:48+5:302019-03-04T23:47:05+5:30
शासकीय विभागात कार भाड्याने लावून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ६० लाख रुपयांची फसवणूक करून फरार युवक सहा वर्षानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या हाती लागला. पोलिसांनी गुजरातच्या सूरत येथून त्याला अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय विभागात कार भाड्याने लावून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ६० लाख रुपयांची फसवणूक करून फरार युवक सहा वर्षानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या हाती लागला. पोलिसांनी गुजरातच्या सूरत येथून त्याला अटक केली. हर्षल नरेंद्र सूर्यवंशी (३४) रा. साईनगर पारडी असे आरोपीचे नाव आहे.
हर्षल १२ वी नापास झाल्यानंतर ड्रायव्हरचे काम करीत होता. त्याने २०१३ मध्ये किरण डंगाले आणि सचिन उंबरकर यांच्या मदतीने फसवणुकीचे काम सुरू केले. हर्षल लोकांना आयकर, आरबीआय आणि रेल्वे विभागात कार भाड्याने लावून देण्याचे आमिष दाखवायचा. दर महिन्याला २५ ते ४० हजार रुपयाची कमाई होईल, असे आमिष तो लोकांना द्यायचा. वाहन भाड्याने लावून देण्यासाठी त्याने तीन लाखापर्यंत रक्कमही लोकांकडून वसूल केली होती. हर्षलने अनेक लोकांना आरबीआय, रेल्वे, आयकर विभागाचे बोगस दस्तावेज दिले होते. त्यामुळे लोकांना त्याच्यावर विश्वास बसला होता. युवराज धोंडेसह २१ लोकांकडून हर्षल तब्बल ६० लाख रुपये घेऊन फरार झाला होता. नियोजित वेळेत वाहन भाड्यावर न लागल्याने लोक चिंतेत पडले. चौकशी केली असता आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी कळमना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला.
आर्थिक गुन्हे शाखेने किरण डंगाले आणि सचिन उंबरकर यांना अटक केली. सचिनच्या खात्यात ५० हजार रुपये जमा झाले होते. तो बोगस आरबीआय अधिकारी बनला होता. तेव्हापासून पोलीस हर्षलला शोधत होते. तो सूरतमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या आधारावर १ मार्च रोजी त्याला सूरतमध्ये अटक करण्यात आली.
हर्षल नागपुरातून फरार झाल्यानंतर तो पंजाब, दिल्ली, हरियाणासह अनेक शहरात फिरत राहिला. तिथे त्याने ड्रायव्हर म्हणून काम केले. हॉटेलमध्येही काम केले. अनेक शहरात फिरल्यानंतर त्याला सूरतमध्ये सहजपणे काम मिळेल, असा विश्वास होता. पोलीस हर्षलशी संबंधित लोकांवर पाळत ठेवून होते. त्याच्यामुळे पोलीस त्याला पकडू शकले. त्याला ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास डीसीपी श्वेता खेळकर यांच्या मार्गदर्शनात पीएसआय स्नेहल राऊत करीत आहेत.