६० लाखांची रोकड मिलिभगतमुळे पोहचली मुंबईत; स्कॅनिंग न करताच 'कर्टन' गाडीत लोड
By योगेश पांडे | Published: April 18, 2024 11:00 PM2024-04-18T23:00:55+5:302024-04-18T23:03:03+5:30
इन्कम टॅक्ससह अनेकांकडून चाैकशी : खळबळजनक खुलासा, रेल्वेचा पार्सल विभाग अडचणीत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : येथील पार्सल विभागाशी संबंधित काही जणांनी मिलिभगत करून दुरांतो एक्सप्रेसमधून ६० लाखांची रोकड पाठविली होती. त्यासाठी त्यांनी पार्सलला पद्धतशिर बायपास केले होते. रेल्वे सुरक्षा दलाने मंगळवारी मुंबईत ही रोकड पकडल्याने रोकड पाठविणारांचा डाव उधळला गेला. दरम्यान, रोकड पकडल्यानंतरच्या प्राथमिक चाैकशीत अनेक खळबळजनक खुलासे झाले आहे. त्यामुळे चाैकशीसाठी इंकम टॅक्ससह अन्य यंत्रणाही पुढे सरसावल्या असून पुढच्या काही तासात धक्कादायक घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उल्लेखनीय असे की, ‘पार्सल’च्या माध्यमातून रेल्वे डब्यातून कोट्यवधींची रोकड इकडून तिकडे केली जात असल्याचे वृत्त २ एप्रिलला 'लोकमत'ने ठळकपणे प्रकाशित केले होते. त्यामुळे रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि अन्य तपास यंत्रणांनी रेल्वेच्या पार्सल डब्यांवर नजर रोखली होती. या पार्श्वभूमीवर, सोमवारी नागपूर स्थानकावरून मुंबईला रवाना झालेल्या आणि मंगळवारी मुंबईत पोहचलेल्या दुरंतो एक्सप्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा दलाने ६० लाखांची रोकड पकडली. ही रोकड येथील एका संजय नामक व्यापाऱ्याने पाठवली होती. कपड्यांच्या कर्टनमध्ये लपवून रोकड दुरंतोच्या डब्यात ठेवण्यात आली होती.
विशेष म्हणजे, नागपूर स्थानकावरच्या पार्सल विभागात अत्याधुनिक स्कॅनर लावण्यात आले आहे. मात्र, हे पार्सल स्कॅन केल्यास आतमध्ये रोकड लपविल्याचे दिसून येईल, हे माहित असल्याने पार्सल विभागाशी संबंधित काही जणांना हाताशी धरून दलालांच्या माध्यमातून हे पार्सल स्कॅनच करण्यात आले नाही. अशा पद्धतीने संगणमत करून स्कॅनरला बायपास करण्यात आले आणि ती रोकड मुंबईला पाठविण्यात आली. मात्र, आरपीएफने ती मुंबईत पकडल्यानंतर नागपूरातील पार्सल विभागाशी संबंधित दलालांचा भंडाफोड झाला. ही रोकड नेमकी कुणासाठी कोणत्या हेतूने पाठविण्यात आली, त्याची चाैकशी करण्यासाठी केवळ पोलीसच नव्हे तर इंकम टॅक्ससह अन्य काही तपास यंत्रणा आता पुढे सरसावल्या आहेत. त्यांनी तशी संबंधित व्यापाऱ्याकडे चाैकशी सुरू केली आहे. शिवाय पार्सल विभागात हातचलाखी करणाऱ्यांचीही चाैकशी होणार आहे. या प्रकाराची कल्पना रेल्वेच्या स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे. त्यामुळे पार्सल विभाग अडचणीत आला असून 'संगणमत' करणारांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
मोठे रॅकेट, हवाला कनेक्शन
रेल्वेच्या पार्सल विभागात वेगवेगळ्या पद्धतीने कोट्यवधींची रोकड, माैल्यवान दागिने आणि अन्य प्रतिबंधित साहित्य लोड करणारे रॅकेट अनेक वर्षांपासून सक्रिय आहे. संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना माहिती न होऊ देता पार्सल विभागात घुटमळणारे, हवाला कनेक्शन असलेले दलाल रोकड, दागिने आणि प्रतिबंधित साहित्याचे पार्सल कोणतीही तपासणी न करता डब्यात ठेवतात आणि ऐच्छिक ठिकाणी ते पोहचवतात. यावेळी मोठी रोकड थेट मुंबईतच पकडली गेल्याने या रॅकेटचे पितळ उघडे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.